पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचे ( Pune Lok Sabha Election 2024 ) चित्र आता स्पष्ट झालं आहे. जवळपास सगळ्याच मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) या उमेदवार असणार आहे. त्यांच्या विरोधात महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांचं नाव समोर येण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील दिले आहेत.
त्यामुळे बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच अजित पवार गटाकडून हा सामना पवार विरुद्ध पवार नसल्याचे सांगत सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांना सासरी जाण्याचा सल्ला दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुणे लोकसभा मतदारसंघातील लढती आता निश्चित झाल्या आहेत. पुण्यातील लढत ही भाजप विरोधात काँग्रेस असणार आहे. शिरूर आणि बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट एकामेकांसमोर उभे ठाकणार आहेत,तर मावळमध्ये शिंदे-ठाकरे गट आमने-सामने असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून शरद पवार गटाचं अस्तित्व आणि अजित पवार गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून विशेष करून बारामती लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्या दृष्टिकोनातून भेटीगाठी, दौरे, बैठकी आणि मेळाव्यांच्या नियोजन करण्यात येत आहे.
शुक्रवारी अशाच प्रकारच्या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पुण्यात करण्यात आलं होतं. या बैठकीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना आगामी लोकसभेच्याबाबत सूचना करण्यात आल्या. यानंतर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
दीपक मानकर म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसकडून समन्वय बैठकीच्या आयोजन करण्यात आलं होतं. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील मतदारसंघामधील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची जनजागृती करण्याच्या सूचना या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षे महाराष्ट्रासाठी खर्च केली आहेत. त्यांचे काम जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे."
"आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) या उमेदवार असतील अशा प्रकारचे कामकाज सुरू आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शिरूर, बारामती आणि मावळ या मतदारसंघांमध्ये ताकद लावण्यात येणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलत आहोत," असं मानकरांनी म्हटलं.
या वेळी बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. याबाबत मानकर यांना विचारले असता ते म्हणाले, "बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना नसून पवार विरुद्ध सुळे असा सामना रंगणार आहे. हे सगळ्यांना स्पष्ट होणं आवश्यक आहे. त्यामुळे माहेरवाशिणीने किती दिवस माहेरी राहायचं, सासरी जायला पाहिजे," असं म्हणत मानकर यांनी सुळे यांच्यावर टीका केली.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.