Shirur Lok Sabha Constituency Election  Sarkarnama
पुणे

Shirur Lok Sabha Constituency Election 2024 : 'या' चार आमदारांनीच शिरुरमध्ये अजितदादांचा केला घात !

Mahavikas Aaghadi dr. Amol Kolhe Leading in Shirur Constituency : शिरूरमधील चारही मतदारसंघात अजित पवार यांना मानणारे आमदार असतानाही निवडणूक लढण्यासाठी दादांना सक्षम उमेदवार मिळाला नाही. राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही लोकसभा लढण्यास नकार दिला..

Chaitanya Machale

Shirur Lok Sabha 2024 Results LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय शिरूर लोकसभा मतदारसंघातील पाच पैकी चार आमदारांनी घेतला होता. या मतदारसंघातील केवळ एकच आमदार हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बाजुने उभा राहिल्याने लोकसभेच्या निवडणुकीत अजितदादांनी दिलेला उमेदवार मोठ्या मताधिक्याने अगदी सहज विजयी होईल, असे बोलले जात होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आमदारांनीच उपमुख्यमंत्री अजितदादांचा घात केला असल्याचे या निवडणुकीत दिसून आले.

शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारासंघाचा समावेश होतो. यापैकी भोसरी वगळता उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शिरूरचे आमदार अशोक पवार वगळता इतर चारही खेडचे दिलीप मोहिते, जुन्नरचे अतुल बेनके, आंबेगावचे दिलीप वळसे-पाटील, हडपसरचे चेतन तुपे हे अजित पवारांबरोबर होते. तर भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे हे महायुतीचे असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीकडून निवडणूक लढविणारे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता.

महायुतीच्या जागावाटपामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांच्याकडे आला. या मतदारसंघातील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजितदादांऐवजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठींबा दिला. कोल्हे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे चिडलेल्या अजितदादांनी जाहीर सभेत कोल्हे यांना पाडणार अशी भूमिका घेतली. त्यानंतर प्रत्येक सभेमध्ये दादांनी अमोल कोल्हे यांच्यावर कडक शब्दात टीकास्त्र सोडत लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणारच, अशी भूमिका घेतली होती.

या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात नक्की कोण उमेदवार अजित पवार देणार, याकडे लक्ष लागले होते. शिरूरमधील चारही मतदारसंघात अजित पवार यांना मानणारे आमदार असतानाही निवडणूक लढण्यासाठी दादांना सक्षम उमेदवार मिळाला नाही. राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणारे प्रदीप कंद यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र या दोघांनी यासाठी नकार दिला. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेत त्यांना उमेदवारी देण्यात आली.

शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोध केला होता. खेड विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते यांनी तर जाहीर विरोध यासाठी दाखविला होता. मोहिते यांची नाराजी त्यानंतर दूर करण्यात आली. आढळराव हे शिवसेनेत असताना त्यांच्या विरोधात 15 वर्षे संघर्ष केला, त्यांचाच प्रचार करायचा का, अशी भुमिका राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली होती. हीच नाराजी मतांच्या माध्यमातून या निवडणुकीत दिसून आली. शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार, मित्र पक्ष असलेल्या भाजपचा एक आमदार असतानाही महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळविता आले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT