LokSabha Election 2024 updates : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा शनिवारी केली. निवडणूक आयोगाकडून पत्रकारपरिषदेतून संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी या सर्व टप्प्यातील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात 50 दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर मतदान होणार आहे. बारामतीत 7 मे म्हणजे 51 दिवसांनी तर पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 13 मे रोजी म्हणजे तब्बल 57 दिवसांनी मतदान होईल. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास दोन महिने प्रचाराची रणधुमाळी अनुभवायला मिळणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची आचारसंहिता कधी लागणार याची चर्चा रंगली होती. अखेर आज निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देशात लक्षवेधी ठरणार आहे. या मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. यापूर्वीच येथे राजकीय पक्षांनी बैठका, मेळावे, मतदान केंद्रनिहाय यंत्रणा लावण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे आणि बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचार सुरु केला आहे. पण या दोन्ही मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. पण काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला नाही. मावळमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीने अधिकृतपणे उमेदवारांची घोषणा केलेली नाही.
जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील एकूण स्थिती पाहता बारामतीमध्ये सुळे यांना प्रचारासाठी 49 दिवस मिळणार असून, तेथे 51व्या दिवशी मतदान आहे. तर मोहोळ, आणि कोल्हे यांना 55 दिवस प्रचारासाठी मिळालेले आहेत. तेथे 57 दिवसांनी मतदान आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे वगळता बारामती, शिरूर, मावळ हे तिन्ही मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या मोठे आहेत. सर्व भागात पोचताना उमेदवारांची दमछाक होत असल्याचा यापूर्वीच्या निवडणुकांमधील अनुभव आहे. मात्र यंदा पुणे जिल्ह्याचा तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात मतदान होणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी मोठा कालावधी मिळाला आहे.
पुणे लोकसभेच्या उमेदवारांनाही या मोठ्या कालावधीचा फायदा होणार आहे. पण भर उन्हाळ्यात प्रचार करताना कार्यकर्त्यांना सांभाळता व खर्च करताना उमेदवारांचा कस लागणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.