निवडणुका जवळ आल्यावर मतदारांना खूष करण्यासाठी काय केले जाते हे यापूर्वी अनेकदा लोकांनी अनुभवले आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनाचे औचित्य साधून घरगुती गॅस सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त केला आहे. निवडणुका जवळ येत असल्याने अशा प्रकारचे चुनावी जुमले तर जाहीर होणारच, या शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. इतकी वर्षे जेव्हा सिलिंडर हजार रुपये होता, महागाईमुळे महिला रडत होत्या, त्यावेळी मोदींना हे का सुचले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. हिंमत असेल तर 400 रुपयांना सिलिंडर करा, असे आव्हानच त्यांनी दिले.
खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेचादेखील सुप्रिया सुळे यांनी कडक शब्दांत समाचार घेतला. त्या म्हणाल्या, राजकारणात आम्ही हिशेब करण्यासाठी नाही आलो तर मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत. 55 वर्षे महाराष्ट्राच्या जनतेने प्रेमाने पवारसाहेबांना आशीर्वाद दिला. त्यांच्यासोबत खंबीरपणे 55 वर्षे उभे राहिलेल्या लोकांतून साहेब निवडून गेले, तर शाह यांनी केलेल्या आरोपाचं उत्तर महाराष्ट्राची जनताच देणार आहे.
गृहमंत्री अमित शाह जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत होते त्यावेळेस ते नेहमी भ्रष्टाचारावर बोलत होते. नॅचरली करप्ट पार्टी ( एनसीपी ) असा उल्लेख ते करायचे. मात्र, या दौऱ्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचा एक शब्दही काढला नाही. त्यामुळे मी त्यांचे जाहीर आभार मानते. त्यांनी जो आरोप केला तो परिवारवादाबद्दल आहे. डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर वकिलाचा मुलगा वकील होऊ शकतो तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचून मते मागितली तर त्यात गैर काय? असा प्रश्नदेखील खासदार सुळे यांनी उपस्थित केला. भाजपमध्येही (BJP) अनेक परिवारवाद आहेत. परिवारातील लोक राजकारणात काम करण्यासाठी लायक आहेत की नाहीत, हे महाराष्ट्रातील जनता ठरवेल, असे त्या म्हणाल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडत असताना गृहमंत्री मात्र शांत आहेत, अशा शब्दांत सुळे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्याच मित्रपक्षाकडून जर का धमक्या येत असतील आणि ते त्याची तक्रार करत असतील तर याचा अर्थ काय? राज्यात भाजपचे सरकार असतानाही सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाच असे धमकावले जात असेल तर इतरांनी कोणाकडे पाहायचे. पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होतो, भर रस्त्यावर खून केले जातात, विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात रस्त्यावर कोयते फिरवत दहशत निर्माण केली जाते, मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा सापडतो, हे गृहमंत्र्यांचं अपयश नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) म्हणाले की, शरद पवार यांनी माहिती न घेता 'ते' आरोप केले आहेत. ते त्यांनी सिद्ध केले नाही तर मी सर्वत्र शरद पवार खोटं बोलत आहेत असे सांगेल. यावर खासदार सुळे म्हणाल्या, ही लोकशाही आहे. शेळके यांना पवारसाहेब खोटे बोलत आहेत, असं वाटत असेल तर त्यांनी खुशाल राज्यभर दौरे करून पवारसाहेब खोटे बोलत आहेत हे सांगावे. आमची काहीही हरकत नाही. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे महाराष्ट्राची संस्कृती विसरले आहेत. महाराष्ट्राचे राजकारण या अदृश्य शक्तीने गलिच्छ केले आहे, अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.