Sunetra Pawar- Mahadev Jankar  Sarkarnama
पुणे

Mahadev Jankar news : सुनेत्रा पवारांना किती मताधिक्य मिळणार ? जानकरांनी सांगितला आकडा !

Chaitanya Machale

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विजयी होणार की विद्यमान खासदार सुप्रिया सुळे चौथ्यांदा विजयी होणार याचा निर्णय 4 जूनला होणार आहे. बारामतीमध्ये विरोधकांना आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने विनाकारण बिनबुडाचे आरोप केले जात असल्याची टीका रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे.

बारामतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. या आरोपांचा महादेव जानकर यांनी समाचार घेतला. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जानकर बोलत होते. बारामतीमध्ये लक्ष्मीदर्शन झाल्याचे काही व्हिडिओ आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मिडीयावर टाकले होते. यावर जानकर यांनी आपली भूमिका मांडली. बारामतीमध्ये पराभव दिसत असल्यानेच ते असे वागत असल्याची टीका त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला कौटुंबिक किनार देण्यात आली. भावनिक आवाहन करून ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न झाला. कोणी रडले तरी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या पाच हजाराने का होईना लोकसभेच्या निवडणुकीत निवडून येतील, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. बारामतीमध्ये विजय निश्चित आहे. दहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये बारामती शहराने माझ्यावर प्रेम केलं असतं तर पवारांना हरवलं असते, असेही ते म्हणाले.

बारामतीमधून निवडणूक लढविताना त्यावेळी मला कमी वेळ मिळाला. माझं चिन्ह देखील लोकांपर्यंत पोहचले नाही. मला त्यावेळी वरिष्ठ म्हणत होते, कमळ चिन्हावर लढा पण मी लढलो नाही. मी माझा पक्ष काढला आहे. त्याच चिन्हावर दिल्लीला जाणार. मला कधीच भाजपच्या कमळ चिन्हावर लढायचे नाही. मेलो तरी चालेल पण हात, बाण आणि कमळावर निवडणूक लढविणार नाही, असे महादेव जानकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT