Baramati News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडवल्या. तत्पूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांच्या तोफखाना धडाडत होता. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक लक्ष लागले होते, ते बारामतीकडे.
इथं शरद पवार आणि अजित पवार यांच्या आमने-सामने सभा होत्या. त्यामुळे सभेत काय होणार, कोण-कोणाविषयी बोलणार यावर लक्ष असतानाच शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी सर्वांचे लक्ष वेधूने घेतले. हा बॅनर झळकताच, प्रेक्षकांच्या गर्दीत जल्लोष झाला.
शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सांगता बारामतीत सभा घेऊन केली. दोघांच्याही सभांना प्रचंड गर्दी होती. त्यामुळे बारामतीमधील राजकीय वातावरण चांगलचं तापलं होते. अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या बाजूने निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे या सभेची युगेंद्र पवार यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी केली होती. तशी बॅनरबाजी देखील करण्यात आली. या सभेला प्रतिभा पवार देखील उपस्थित होत्या. त्या प्रेक्षकांच्या गर्दीत बसल्या होत्या.
गर्दीत बसलेल्या प्रतिभा पवार यांनी प्रेक्षकांच्या गर्दीतून एक बॅनर झळकवला. 'जिकडं म्हातारं फिरतंय तिकडे चांगभलं हुतंय असं लिहिलेला बॅनर झळकवताच, प्रेक्षकांनी आणि युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. हा बॅनर झळकवताच कधी नव्हे, ते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा चर्चेत आल्या. अजितदादांनी प्रतिभाकाकींविषयी जाहीर तक्रार करत, काकी आधी कुणाच्या प्रचारात आल्या नाहीत. नातवाचा इतका पुळका का आला आहे? असा तक्रारीचा प्रश्न केला होता.
दरम्यान, प्रतिभा पवारांना बारामती (Baramati) टेक्स्टाईल पार्कच्या प्रवेशद्वारावर रोखल्याची घटना देखील घडली. ही घटना पुढे येताच, अनेक गोष्टींनी चर्चा बारामतीत रंगली. आता प्रतिभा पवार यांनी शरद पवार यांच्या प्रचाराच्या शेवटच्या सभेला हजेरी लावून बारामतीमधील वारं आणखी फिरवून टाकलं. शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचाराचा धडाका लावला होता. पक्ष फुटल्यापासून पवारांनी न थकता न विश्रांती घेता, महाराष्ट्र पिंजून काढून भाजप महायुतीला रोखलं. आजच्या बारामतीमधील सांगता सभेकडे देखील राज्याचे लक्ष होते. शरद पवार या सभेत नेमकं काय बोलणार याची उत्सुकता होती.
बारामतीमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात थेट लढत आहे. हे काका-पुतण्याच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवसाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. जाहीर प्रचाराची आज सांगता झाल्यानंतर आता मतदानच्या दिवसापर्यंत, म्हणजेच 20 नोव्हेंबरपर्यंत छुपा प्रचारावर अधिक भर राहणार आहे. या पुढील दोन दिवसांच्या काळात बारामतीमधील राजकारण ढवळून निघेल, असे चित्र निर्माण झाले आहे. मतमोजणीनंतर देखील बारामतीमधील राजकीय वातावरण तापलेलेच राहील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.