Pune News : राज्यातील काही महिला लोकप्रतिनिधींशी संबंधित आक्षेपार्ह ऑडिओ संभाषणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनाही याबाबतचे निवेदन पाठवले आहे. या प्रकरणात केवळ ऑडिओ क्लिप प्रसारित करणाऱ्यांवर वरवरची कारवाई करून चालणार नाही, असे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.
ऑडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले आहेत का, सुमारे ३५०० कथित ऑडिओंचा डिजिटल डेटा कुठून आला आणि या षड्यंत्राचा मूळ उगम काय आहे, याची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय न्याय संहिता मधील सायबर गुन्ह्यांशी संबंधित तरतुदी तसेच कटकारस्थानाचे कलम ६१ आणि इतर लागू कायद्यांनुसार या साखळीत सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवेदनामध्ये केली आहे. अशा बदनामीकारक प्रकारांमुळे महिला लोकप्रतिनिधींच्या सन्मानाबरोबरच त्यांच्या कामाच्या मूलभूत अधिकारांवर आणि स्वातंत्र्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
महिलांचा अवमान करणारे ऑडिओ, व्हिडिओ किंवा अन्य आक्षेपार्ह साहित्य सोशल मीडियावर पसरण्यापूर्वीच रोखण्यासाठी राज्य सायबर यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. प्रकरणाची वाढती व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता, संपूर्ण सत्य बाहेर आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने कठोर भूमिका घेऊन हा तपास CID कडे वर्ग करावा, असे डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.