Sarkarnama
पुणे

BJP News : महाराष्ट्र भाजपच्या बैठकीत ‘यूपी पॅटर्न’चा गमछा; हिरवा रंग गायब, चर्चेला उधाण!

Maharashtra BJP meeting UP pattern gamcha green color missing : महाराष्ट्र भाजपच्या बैठकीत ‘यूपी पॅटर्न’चा गमछा चर्चेचा विषय ठरला आहे. गमछ्यातील एक रंग गायब असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यात आज भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार आणि राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. मात्र, बैठकीपेक्षा पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या किटमधील एका वस्तूचीच सध्या अधिक चर्चा रंगली आहे.

बैठकीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी भाजपकडून विशेष किटची व्यवस्था करण्यात आली आहे. या किटमध्ये टोपी, गमछा, पुस्तक आणि स्नॅक्स देण्यात आले आहेत. यापैकी गमछाने मात्र भाजपच्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळा असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भाजपच्या गमछ्यातून ‘हिरवा’ रंग गायब?

भाजपच्या बहुतांश कार्यक्रमांमध्ये दिसणाऱ्या गमछ्यावर साधारणपणे हिरवा आणि भगवा/नारंगी रंग, तसेच कमळाचे चिन्ह पाहायला मिळते. मात्र, पुण्यातील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी देण्यात आलेला गमछा पूर्णपणे भगव्या रंगाचा आहे. त्यामुळे या बदलाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

उत्तर भारतातील, विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये भाजपच्या कार्यक्रमांमध्ये पूर्ण भगव्या रंगाच्या गमछ्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. आता महाराष्ट्र भाजपच्या महत्त्वाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीतही अशाच पद्धतीचा गमछा देण्यात आल्याने ‘यूपी पॅटर्न’ महाराष्ट्रात आणण्यामागे पक्षाची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गमछ्याच्या रंगात झालेला हा बदल केवळ कार्यक्रमापुरता आहे की भाजपच्या आगामी संघटनात्मक आणि राजकीय वाटचालीचे त्यातून काही संकेत दिले जात आहेत, याची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणीची बैठक आहे. त्यामुळे आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक दिशा, निवडणुकीची तयारी आणि राजकीय रणनीती यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या बैठकीत पक्षाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीसह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. राजकीय आणि सामाजिक विषयांवरील ठरावही बैठकीत मांडले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारोपाच्या कार्यक्रमात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

मात्र, या सगळ्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर ‘भाजपच्या गमछ्यातील एक रंग गायब कसा झाला?’ आणि ‘हा नेमका यूपी पॅटर्न आहे का?’ याचीच चर्चा सध्या भाजपच्या बैठकीत रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT