Dattatray Bharne Sarkarnama
पुणे

Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, 30 सप्टेंबरनंतर परिस्थितीचा आढावा; 5 ऑक्टोबरपर्यंत निर्णय

Dattatray Bharne On Drought Declaration: महाराष्ट्रात अद्याप कोणत्याही जिल्हा किंवा तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला नाही, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. ३० सप्टेंबरनंतर आढावा घेऊन ५ ऑक्टोबरपर्यंत निर्णय अपेक्षित आहे.

Sudesh Mitkar

Dattatray Bharne On Drought Declaration: राज्यातील काही भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर काही जिल्हे अथवा तालुके दुष्काळातून वगळण्याचे दाखवले जात आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अशा बातम्या फेक न्यूज असल्याचे स्पष्ट करत, आतापर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात अथवा तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नसल्याचे सांगितले.

कृषीमंत्री भरणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सोयाबीन तसेच कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आपणही शेतकरी कुटुंबातून आलो असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, पीक विमा आणि इतर माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही नियम व निकष आहेत. त्यानुसार ३० सप्टेंबर ही महत्त्वाची तारीख आहे. या तारखेनंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे ५ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळाबाबत निर्णय अपेक्षित आहे, असे भरणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दुष्काळाच्या निर्णयाची प्रक्रिया सुरू असतानाच सोशल मीडियावर वेगवेगळ्या जिल्ह्यांबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. ‘अमुक जिल्हा दुष्काळातून वगळला’, ‘अमुक तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला’ अशा स्वरूपाच्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

‘जळतं त्यालाच कळतं’; बांधावर जाऊन पाहणी

मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील परिस्थिती गंभीर असून, स्वतः बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केल्याचे भरणे यांनी सांगितले. “जळतं त्यालाच कळतं. शेतकरी खूप अडचणीत आहे. या अडचणीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

आगामी काळात विविध विभागांचा आढावा घेतला जाणार आहे. उद्या ठाणे आणि पुणे विभागाचा, तर शनिवारी नाशिक विभागाचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मदतीसाठी निर्णयाची वाट पाहणार नाही’

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत करण्याची भूमिका असल्याचे भरणे यांनी सांगितले. कर्जमाफीच्या स्वरूपातील मदतीबाबतही सरकारकडून कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

५ ऑक्टोबरपर्यंत परिस्थितीचा आढावा घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही निर्णयाची वाट पाहणार नाही,” असे भरणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रात दुष्काळाबाबत फेक न्यूज पसरत असल्यास पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT