Maharashtra MLC Election News: शिक्षकांच्या डोक्यावर विविध प्रशासकीय कामांचा भार असतानाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान करता यावे, यासाठी महाराष्ट्रातील पात्र शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भरपगारी विशेष नैमित्तिक सुट्टी जाहीर केली आहे. तर खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारांना मतदानासाठी चार तासांची विशेष सवलत देण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयायामुळे कामाच्या व्यापात मतदानासाठी वेळ काढण्याची कसरत करणाऱ्या नोकरदार मतदारांना दिलासा मिळणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासह पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मतदानाच्या दिवशी संबंधित मतदारसंघातील पात्र शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भरपगारी विशेष नैमित्तिक सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ब अंतर्गत ही सवलत देण्यात येणार आहे. ही सुट्टी कर्मचाऱ्यांना नियमितपणे मिळणाऱ्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असेल. त्यामुळे मतदानासाठी स्वतंत्र वेळ काढण्याची अडचण असलेल्या पात्र शासकीय कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदारांनाही मतदानासाठी विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी दोन तासांची असलेली सवलत वाढवून चार तास करण्यात आली आहे. त्यामुळे कामाच्या वेळेतून मतदानासाठी वेळ काढणे खासगी क्षेत्रातील मतदारांना शक्य होणार आहे.
पुणे विभागासाठी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली-उगले यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. मतदानाच्या दिवशी पात्र मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संबंधित आस्थापनांनी आवश्यक व्यवस्था करावी, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, शाळांना दिवाळीच्या सुट्या लागल्या असल्या, तरी शिक्षकांच्या कामांचा व्याप पूर्णपणे संपलेला नाही. ऑनलाइन माहिती भरणे, विविध सर्वेक्षणे, प्रशासकीय अहवाल आणि अन्य अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना सुट्यांच्या काळातही काम करावे लागत असल्याचे चित्र आहे.
अशा परिस्थितीत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भरपगारी विशेष सुट्टी जाहीर झाल्याने संबंधित पात्र शासकीय शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे, खासगी क्षेत्रातील मतदारांनाही चार तासांची सवलत मिळणार असल्याने मतदानासाठी वेळ काढणे सोपे होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.