Professor Dnyaneshwar Rote dies in accident while traveling for voter list revision meeting amid SIR campaign in Maharashtra, raising concerns over work pressure. Sarkarnama
पुणे

SIR In Maharashtra : निवडणूक आयोगाच्या SIR चा महाराष्ट्रात पहिला बळी : पुण्यात BLO म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकाचा मृत्यू

SIR In Maharashtra : मतदार यादी पुनर्निरीक्षण बैठकीसाठी जाताना प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे यांचा अपघाती मृत्यू झाला. शिक्षकांनी कामाच्या ताणाचा आरोप केला असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सरकारनामा ब्युरो

SIR In Maharshtra : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहीम सुरु केली आहे. यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी अचानक बोलावलेल्या बैठकीला जाताना अपघात होऊन लोहगाव येथील एका प्राध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्ञानेश्वर रोटे (वय 40, रा. रोटेवाडी, रावळगाव अहिल्यानगर) असे मयत प्राध्यापकांचे नाव आहे. मतदार शोधण्याच्या कामाच्या दडपणात हा अपघात झाल्याचा शिक्षकांनी आरोप केला असला तरी पोलिसांनी मात्र आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

लोहगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (13 एप्रिल) दुपारी साडेबारा वाजण्याच्या प्राध्यापक रोटे हे आपल्या दुचाकीवरून उपजिल्हाधिकारी यांच्या बैठकीला चालले होते. धानोरी लोहगाव रस्त्यावरील स्पार्क स्प्रिंग सोसायटी समोर आले असता त्यांचा अपघात झाला. त्यांची दुचाकी घसरली आणि ते चेहऱ्यावर पडून त्यांना जखम झाली. यात त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाने त्यांना जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्राध्यापक रोटे हे मूळचे अहिल्यानगरचे होते. इंदापूर तालुक्यातील कळंब येथून त्यांची नुकतीच लोहगाव येथे बदली झाली होती. ते वडगाव शेरी मतदारसंघात बीएलओ म्हणून मतदार याद्या दुरुस्तीचे काम करत होते. त्यांना एक सहा वर्षांचा मुलगा, अकरा वर्षांची एक मुलगी आहे. लोहगाव पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून'ला पाठवला आहे. प्राध्यापक रोटे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

अत्यंत हुशार आणि मनमिळावू सहकारी गमावला…

प्राध्यापक रोटे यांच्यासोबत रविवारी दिवसभर मतदार शोधून ते मॅपिंग करण्याचे काम त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी केले. परंतु आज अपघाताची बातमी कानावर पडल्यानंतर शाळेतील त्यांचे सहकारी शिक्षक , विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. अत्यंत हुशार आणि मनमिळावू सहकारी गमावला असे सांगताना अनेक शिक्षकांना अश्रू अनावर झाले. शाळेतील काम सांभाळताना मतदार नोंदणीचे आणि अधिकाऱ्यांचे दडपण असल्याचे यावेळी शिक्षकांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये 107 मृत्यू :

यापूर्वी पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही SIR प्रक्रियेदरम्यान अनेकांचे मृत्यू झाले आहेत. पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, SIR प्रक्रियेदरम्यान मानसिक तणावामुळे 107 जणांचा मृत्यू झाले होते. नियम 169 अन्वये विधानसभेत याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT