पुण्यात एका भोंदूबाबाने महिलेवर लैंगिक अत्याचार करत तिला 50 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
दैवी शक्ती आणि कौटुंबिक वाद सोडवण्याचे आमिष दाखवत आरोपीने विश्वास संपादन केला होता.
स्वारगेट पोलिसांनी आरोपी औदुंबर गडदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
pune crime news : अंगात दैवीशक्तीचा संचार असून, कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आमिष दाखवत एका भोंदूने पुण्यातील महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भोंदूने बांधकाम व्यवसायात गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून या महिलेला ५० लाख ५५ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. औदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे या भोंदूचे नाव आहे. याबाबत एका ४२ वर्षीय पीडित महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये कौटुंबिक वाद असल्याने ते वेगळे राहत आहेत. पाच वर्षांपूर्वी एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत या महिलेची गडदे याच्याशी भेट झाली. त्यावेळी गडदे याने आपण देवऋषी असल्याचे महिलेला भासविले. तसेच ‘माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार असून, मी तुमचे कौटुंबिक मतभेद दूर करतो,’ असा विश्वास देत महिलेला आपल्या जाळ्यात ओढले.
त्यानंतर त्याने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतरही त्याने लोणेरे, उत्तेखोल आणि माणगाव परिसरातील लॉजवर बोलावून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. तसेच त्याने पीडित महिलेला लाखो रूपयांना गंडाही घातला.
गुंतवणुकीच्या आमिषाने उकळले लाखो रुपये
कौटुंबिक मतभेद सोडविण्यासह आरोपी गडदे याने महिलेला नोकरीस लावण्याचे आणि बांधकाम व्यवसायातील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचेही आमिष दाखवले. मे २०२१ पासून त्याने महिलेकडून रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरूपात वेळोवेळी ५० लाख ५५ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, अखेर महिलेने ११ एप्रिल रोजी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.
भोंदूगिरीचे प्रकार वाढले
दरम्यान नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर दैवीशक्तीचा संचार असल्याचे भासवून एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ऋषीकेश श्रीकांत वैद्य (वय ३९, रा. वसई, जि. पालघर) याला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. त्यानंतर आता शहरात हा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
1. हा प्रकार कुठे घडला आहे?
हा प्रकार पुण्यात घडला असून स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
2. आरोपीने काय केले होते?
दैवी शक्तीचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केला आणि गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे उकळले.
3. किती रकमेची फसवणूक झाली आहे?
सुमारे 50 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगितले जाते.
4. पोलिसांनी काय कारवाई केली आहे?
आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
5. आरोपी कोण आहे?
औदुंबर मनोहर गडदे नावाचा व्यक्ती असून तो सोलापूर जिल्ह्यातील आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.