Pune Sugar Factory News: राज्यातील यंदाच्या २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाने आता वेग पकडण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील १३८ सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून, आतापर्यंत तब्बल १३२ लाख ७ हजार टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. या गाळपातून सरासरी ८.१९ टक्के साखर उताऱ्यानुसार १०.८७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पुणे विभागाने आघाडी घेतली असून, सोलापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी आंदोलन स्थगित केल्याने सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी पंधरवड्यात राज्यातील सुरू असलेल्या कारखान्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, यंदाच्या गाळप हंगामाला खऱ्या अर्थाने गती मिळणार असल्याचे साखर आयुक्तालयातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
साखर आयुक्तालयाच्या ५ नोव्हेंबरअखेरच्या अहवालानुसार, राज्यात आतापर्यंत ६४ सहकारी आणि ७४ खासगी अशा एकूण १३८ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. विभागनिहाय आकडेवारी पाहता पुणे विभागातील २७ कारखान्यांनी ३७.३२ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या विभागाचा सरासरी साखर उतारा ८.९१ टक्के असून, ३३.२६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
ऊस गाळपाच्या बाबतीत सोलापूर विभागाने दुसरे स्थान मिळवले आहे. या विभागातील ३० कारखान्यांनी आतापर्यंत २५.१९ लाख टन उसाचे गाळप केले आहे. मात्र, सरासरी साखर उतारा ७.५९ टक्के असल्याने १९.११ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
दुसरीकडे, शेतकरी संघटनांच्या आंदोलनाचा परिणाम कोल्हापूर विभागातील कारखान्यांच्या कामकाजावर झाला होता. त्यामुळे ५ नोव्हेंबरअखेर या विभागातील केवळ १७ कारखाने सुरू होते. या कारखान्यांनी १४.६८ लाख टन उसाचे गाळप केले असून, राज्यातील सर्वाधिक ९.४१ टक्के साखर उतारा नोंदवला आहे. त्यातून १३.८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
अन्य विभागांतील गाळपाचा विचार करता अहिल्यानगर विभागात २०.८ लाख टन, छत्रपती संभाजीनगर विभागात १५.२४ लाख टन, नांदेड विभागात १७.९६ लाख टन आणि अमरावती विभागात १.५१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. नागपूर विभागातील कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप सुरू झालेला नाही.
साखर उताऱ्याच्या बाबतीत नांदेड विभागात ७.५५ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ७.४३ टक्के, अमरावती विभागात ७.५५ टक्के, तर अहिल्यानगर विभागात ८.११ टक्के उतारा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे विभागनिहाय साखर उताऱ्यातही मोठी तफावत दिसून येत आहे.
यंदाच्या हंगामासाठी साखर आयुक्तालयाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून आतापर्यंत २०० साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात १३८ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलन स्थगित झाल्यामुळे उर्वरित कारखानेही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आगामी काळात राज्यातील गाळपाचे प्रमाण वाढणार असून, साखर उत्पादनातही भर पडणार आहे. सध्या राज्यात जवळपास ११ लाख टनांहून अधिक साखरेचे उत्पादन झाले असून, हंगाम जसजसा पुढे जाईल तसतसे उत्पादनाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.