Sunil Shelke Vs Bala Bhegde  Sarkarnama
पुणे

Maval Politics: महायुतीत ठिणगी! सुनील शेळकेंनी भाजपला डिवचलं; भाजपने मोर्चातून दिलं उत्तर, मावळात युतीचा ‘खेळ’ बिघडला?

Maval Politics Sunil Shelke vs BJP: मावळमध्ये सुनील शेळके यांच्या वक्तव्यावरून भाजपने निषेध मोर्चा काढल्याने महायुतीतील भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे (पुणे): केंद्र आणि राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मावळात मात्र आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे. आमदार सुनील शेळके यांनी भाजपमधील कथित गटबाजीवर केलेली टीका, त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने काढलेला निषेध मोर्चा आणि विकासकामांच्या श्रेयावरून सुरू असलेली स्पर्धा यामुळे महायुतीतील स्थानिक मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. वरिष्ठ पातळीवरील युती आणि स्थानिक राजकीय वर्चस्वासाठी सुरू असलेली चढाओढ यातील विरोधाभासामुळे महायुतीतील समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेळके यांच्या टीकेनंतर भाजपचा निषेध मोर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात आमदार सुनील शेळके यांनी मावळातील भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली. भाजपमध्ये तीन स्वतंत्र गट असल्याचा दावा करत त्यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, रवींद्र भेगडे यांच्याशी संबंधित गटांसह अन्य गटांचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत छायाचित्रे काढूनही अपेक्षित लाभ न मिळाल्यास आंदोलने केली जातात, असा टोलाही त्यांनी लगावला.

शेळके यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अवमान झाल्याचा आरोप केला. या वक्तव्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथे भाजपने नुकताच मोर्चा काढला. त्यामुळे दोन्ही पक्षांतील मतभेद सार्वजनिक पातळीवर आले. स्थानिक नेतृत्व, विकासकामांचे श्रेय आणि निधीवाटपावरून सुरू असलेली स्पर्धाही या संघर्षामागील महत्त्वाची कारणे मानली जात आहेत.

भाजपच्या प्रभावक्षेत्रात राष्ट्रवादीचे आव्हान

मावळ तालुका एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आमदार सुनील शेळके हेही पूर्वी भाजपमध्ये होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत शेळके यांनी तब्बल ९४ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजयाची पुनरावृत्ती करत १ लाख ८ हजार मतांचे मताधिक्य मिळवले.

या राजकीय बदलांमुळे मावळातील पक्षीय समीकरणांना नवे वळण मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसची वाढलेली ताकद आणि भाजपचे स्थानिक संघटन यांच्यातील स्पर्धा कार्यकर्त्यांची बांधणी, विकासकामांचे श्रेय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभावावरून अधिक ठळक होत आहे.

युतीचा समन्वय की स्थानिक वर्चस्व?

महायुतीत सहभागी असूनही मावळात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपापली संघटनात्मक ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदार शेळके यांनी विकासकामांच्या जोरावर पुन्हा निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे; तर भाजपकडूनही संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि राजकीय प्रभाव टिकविण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे.

वरिष्ठ पातळीवरील युती स्थानिक पातळीवर कितपत समन्वय साधू शकते, हा प्रश्न या संघर्षातून उपस्थित होत आहे. दोन्ही पक्ष मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येणार की आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरूच राहणार, याकडे मावळातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार सुनील शेळके यांचे नाव निश्चित असल्याचे समजते. तर भाजपकडून माजी मंत्री बाळा भेगडे, रविंद्र भेगडे, प्रशांत भागवत, रणजीत काकडे यांची नावे चर्चत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT