Smart City  
पुणे

स्मार्ट सिटीच्या कामात स्मार्ट घोळ; उपकंत्राटांचेही पुढे दिले उपकंत्राट!

स्मार्ट सिटीच्या कामाचे बेकायदा उपकंत्राट देण्यात आले. या उपकंत्राटाचेही पुढे उपकंत्राट देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उत्तम कुटे- सरकारनामा ब्युरो

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad) स्मार्ट सिटीच्या (Smart City) कामात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आधीच झाला आहे. त्यात एल अॅण्ड टी कंपनीला दिलेल्या अडीचशे कोटी रुपयांच्या कामाला तांत्रिक मंजुरीच घेतली नसल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. आता याच कामाचे बेकायदा उपकंत्राट देण्यात आले आणि या उपकंत्राटाचेही पुढे उपकंत्राट देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यातून पिंपरी चिंचवड महापालिकेची (PCMC) मोठी फसवणूक झाल्याने चौकशीची मागणी आता करण्यात आली आहे.

शहरभरात अशा प्रकारे स्मार्ट सिटीचे काम उपकंत्राटदारच करत आहेत. त्यातील बहुतांश राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांना ही उपकंत्राटे दिलेली आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा निकृष्ठ असल्याच्या तक्रारी येत आहेत. राजकीय नेत्यांचे कार्यकर्तेच ठेकेदार बनून काम करतात अथवा त्यांनी तिसऱ्याला उपकंत्राट दिल्याचे समोर येत आहे. नेत्यांच्याच पाठबळावर सर्व उपकंत्राटांचे काम सुरू असल्याने या चुकीच्या कामात प्रशासन कुठलीच कारवाई करत नाही, अशी चर्चा सुरू आहे.

या गैरव्यवहाराचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासमोरील सुनावणीत हा गैरप्रकार उघडकीस आणणाऱ्या आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणाऱ्या जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी ही भीती व्यक्त केली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत एल अॅण्ड टी कंपनीला दिलेल्या सुमारे २५० कोटी रुपयेच्या कामांचे नियमबाह्य पध्दतीने उपकंत्राट देऊन महापालिकेची मोठ्या फसवणूक करण्यात आली आहे. एकाने दुसऱ्याला तिसऱ्याला असे उप-उपकंत्राट देऊन मूळ निकषानुसार काम न करता कामाच्या दर्जाची वाट लावून टाकली, असेही सीमा सावळे यांनी निदर्शनास आणून दिले.

सल्लागाराने स्मार्ट सिटी कंपनी ऐवजी ठेकेदाराचे हित जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. ही बाब संतापजनक असून स्मार्ट सिटीच्या मूळ हेतूलाच हरताळ फासणारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. उप-उपकंत्राटांमध्ये फार मोठा घोळ असून, केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका आणि करदात्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे या प्रकऱणात सखोल चौकशीची मागणी सावळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. बेकायदा कामाला राजकीय दबावापोटी पाठीशी घालण्यासाठी एल. अॅण्ड टी कंपनीला दिलेल्या कामांकडे महापालिका प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT