Pune Shivaji Nagar Metro, Bus Stand 
पुणे

Shivaji Nagar Bus Stand: पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकाचा होणार कायापालट! प्रवाशांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार रेल्वे, मेट्रो अन् एसटी

Shivaji Nagar Bus Stand: पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेची नवी दिशा देण्यासाठी शिवाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकाचा अत्याधुनिक बस पोर्टमध्ये विकास करण्यात येणार आहे.

Amit Ujagare

Shivaji Nagar Bus Stand: पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेची नवी दिशा देण्यासाठी शिवाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकाचा अत्याधुनिक बस पोर्टमध्ये विकास करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांच्यामध्ये संयुक्त विकासाचा सामंजस्य करार करण्यात आला.

या प्रकल्पामुळे पुणेकरांसह राज्यभरातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि एकात्मिक वाहतुक सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिवाजीनगर मेट्रो स्थानक, रेल्वे स्थानक आणि एसटी बसस्थानक यांची प्रभावी सांगड घालून प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि गतिमान करण्याचे उद्दिष्ट आहे.

१५,४०० चौ. मीटर जागेचा संयुक्त विकास

शिवाजीनगर येथील एसटी महामंडळाच्या सुमारे १५,४०० चौरस मीटर जागेवर हा विकास प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यापैकी सुमारे ४९०० चौरस मीटर जागेवर महामेट्रोने शिवाजीनगर मेट्रो स्थानक उभारले आहे. उर्वरित सुमारे १०,५०० चौरस मीटर जागेवर बस पोर्ट आणि व्यावसायिक विकासाची योजना आखण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी महामेट्रोची 'प्रकल्प अंमलबजावणी प्राधिकरण' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर हा विकास करण्यात येणार असून, प्रकल्पाची व्यवहार्यता, आर्थिक मूल्यांकन आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन विकासाचे स्वरूप निश्चित केले जाईल.

आधुनिक बस पोर्ट आणि व्यावसायिक सुविधा

प्रस्तावित विकासामध्ये एसटी बस टर्मिनस, बस आगार, बस पार्किंग, आवश्यक व्यावसायिक आणि कार्यालयीन जागा तसेच प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधांचा समावेश असेल. मेट्रो आणि रेल्वे स्थानकांशी थेट जोडणी करून बहुविध वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिक केंद्र उभारण्यात येणार आहे.

प्रकल्पाच्या बांधकामासाठी सध्याचे एसटी बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात वाकडेवाडी येथील आरे डेअरीच्या जागेवर स्थलांतरित करण्यात आलेले आहे. या तात्पुरत्या बसस्थानकासाठी आवश्यक मूलभूत सुविधा महामेट्रो उपलब्ध करून दिली आहे. शिवाजीनगर येथे नव्या बस टर्मिनसची उभारणी पूर्ण झाल्यानंतर एसटी बसस्थानक पुन्हा मूळ जागी सुरू होईल.

एसटीच्या आर्थिक हिताचे संरक्षण

या करारानुसार, एसटी महामंडळाच्या जमिनीचे मुल्यांकन आणि प्रकल्पातील गुंतवणुकीचा वाटा विचारात घेऊन महसूल वाटप निश्चित केले जाणार आहे. महामेट्रोला प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ४ टक्के पर्यवेक्षण शुल्क मिळणार आहे. प्रकल्पासाठी ४९ + ४९ वर्षांच्या भाडेपट्ट्याचा विचार करण्यात आला असून, शासनाच्या लागू नियमांचे पालन केले जाणार आहे.

एसटी महामंडळाच्या जमिनीचा अधिकाधिक उपयोग करून प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील समन्वय वाढविणे आणि महामंडळाच्या उत्पन्नवाढीस हातभार लावणे, हा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

शिवाजीनगर बसस्थानकाचा हा विकास पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT