CM Eknath Shinde News Sarkarnama
पुणे

CM Eknath Shinde News : मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य अपेक्षित, राजकारण न करण्याची शिंदेंची साद

उत्तम कुटे

Pimpri : श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (ता.११) बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरला दर्शनासाठी आले होते. या वेळी त्यांनी थातूरमातूर आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक राज्य सरकारला करायची नसून ते टिकाऊ द्यायचे आहे, त्यासाठी थोडा वेळ हवा आहे, अशी साद घातली.

मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. त्याचवेळी इतर समाजाचे आरक्षण कमी न करता न्यायालयात टिकेल असे मराठा आरक्षण देणार आहे, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. मात्र, त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. कारण मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे सिद्ध करावे लागणार आहे म्हणून सरकारने त्याला प्राधान्य दिले आहे. मात्र, त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे, असे सांगत त्यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांडे-पाटील यांना ते सोडण्याचे विनंतीवजा आवाहन पुन्हा एकदा केले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण (ईसीबीसी) दिले होते, पण दुर्दैवाने न्यायालयात ते टिकले नाही, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. त्यामुळेच या वेळी कायद्याच्या चौकटीत बाधा येणार नाही, असे हे आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठीच आज सर्वपक्षीयांची बैठक मुंबईत बोलावली आहे, असे ते म्हणाले. यासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य अपेक्षित असून, यात त्यांनीच नाही तर कुणीच राजकारण आणता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन सुरू आहे. त्यांनी आता पाणी आणि औषध घेण्यासही नकार दिला आहे. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT