Daund News Sarkarnama
पुणे

Daund News : 'चले जाव...चले जाव...संजय राऊत चले जाव...' ; दौंडमध्ये राऊतांविरोधात मराठा तरुणांची जोरदार घोषणाबाजी

Maratha Reservation : काष्टीच्या दौऱ्यावर जाण्यासाठी आलेले संजय राऊत यांचा दौंडमध्ये मुक्काम होता.

प्रफुल्ल भंडारी

Daund : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दौंड शहरातील सकाल मराठा समाजाने जोरदार घोषणाबाजी केली. ‘खासदार संजय राऊत चले जाव, चले जाव’ अशाही घोषणा या वेळी मराठा बांधवांकडून देण्यात आल्या. (Maratha youth shouting slogans against shivsena MP Sanjay Raut)

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुतणे तथा शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्या काष्टी येथील संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन आज (ता. २९ ऑक्टोबर) सायंकाळी होणार आहे. त्या अगोदर काष्टीत शिवसेनेचा मेळावाही आयोजित करण्यात आलेला आहे. त्या दोन्ही कार्यक्रमासाठी खासदार राऊत आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काष्टीच्या दौऱ्यावर जाण्यासाठी आलेले संजय राऊत यांचा दौंडमध्ये मुक्काम होता. सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर ते थांबलेल्या हॉटेलच्या बाहेर जमून सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शहरात सध्या सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे. त्या उपोषणस्थळाजवळील हॉटेलमध्येच खासदार राऊत हे मुक्कामी हेाते.

खासदार राऊत हे शहरातील याच हॉटेलमध्ये थांबल्याचे कळताच मराठा समाजातील तरुणांनी संजय राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘चले जाव चले जाव’ यासह तीव्र शब्दांत घोषणाबाजी केली. मराठा समाजाच्या वतीने मागील काळात काढण्यात आलेल्या मूक मोर्च्याच्या संदर्भात ‘सामना’मध्ये एक व्यंग्यचित्र छापून आले होते. त्यासंदर्भानेही मराठा तरुणांनी या वेळी राऊतांच्या विरोधात शेरेबाजी करण्यात आली.

दरम्यान, शिवसेनेच्या दौंडमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाच्या तरुणांशी या बाबत संवाद साधला. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, मराठा समाजातील तरुण आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT