M.K.Deshmukh  Sarkarnama
पुणे

Marathwada Graduate Constituency : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुतीमध्ये बंडाचा झेंडा; भाजपाच्या एम.के. देशमुखांनी दाखल केली उमेदवारी

Chhatrapati Sambhajinagar Politics: एम.के. यांच्या उमेदवारीने महायुतीचे सतीश चव्हाण यांच्या अडचणी वाढू शकतात. अर्थात अजून माघारीची मुदत आहे, या दरम्यान, भाजपाचे वरिष्ठ नेते एम.के.देशमुख यांचे मन वळवण्यात यशस्वी होतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Jagdish Pansare

Mahayuti Politics : छत्रपती संभाजीनगर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुतीने अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर बंडखोरी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी शांत राहा, असे आवाहन केले होते. परंतु याकडे कानाडोळा करत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्याविरोधात बंडखोरीचे निशाण फडकले आहे.

पदवीधरच्या उमेदवारीचा शब्द घेऊन काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी शिक्षणाधिकारी एम.के.देशमुख यांनी मंगळवारी (ता.6 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला अर्ज दाखल केला आहे.

एम.के. यांच्या उमेदवारीने महायुतीचे सतीश चव्हाण यांच्या अडचणी वाढू शकतात. अर्थात अजून माघारीची मुदत आहे, या दरम्यान, भाजपाचे वरिष्ठ नेते एम.के.देशमुख यांचे मन वळवण्यात यशस्वी होतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आज छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. पदवीधरांच्या अपेक्षा, प्रश्न आणि भविष्याशी निगडित आव्हानांना सक्षमपणे मांडण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. पदवीधरांचा आवाज केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, तो सभागृहात सातत्याने आणि प्रभावीपणे उमटला पाहिजे.

आजचा पदवीधर हा केवळ नोकरीच्या संधींच्या शोधात नाही, तर त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण, रोजगाराच्या नव्या संधी, कौशल्यविकास, स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम व्यवस्था, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. या प्रत्येक विषयाचा अभ्यास करून, प्रश्न समजून घेऊन आणि त्याच्या निराकरणासाठी शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याचा माझा निर्धार आहे.

पदवीधरांच्या हिताचा प्रत्येक विषय माझ्यासाठी प्राधान्याचा विषय असेल. आपण आजवर दिलेला विश्वास, प्रेम आणि सहकार्य हीच माझी सर्वात मोठी ऊर्जा आहे. या विश्वासाची जाणीव ठेवून पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि सातत्याने काम करण्यास मी कटिबद्ध आहे, असे एम.के.देशमुख यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टवर म्हटले आहे.

पदवीधरांचा सन्मान, त्यांचे हक्क आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची ही वाटचाल आपल्या सर्वांच्या साथीने पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आहे. आपला विश्वास हीच माझी ताकद आणि पदवीधरांचे हित हेच माझे ध्येय, असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

आता देशमुख आपल्या उमेदवारीवर ठाम राहतात, की पक्षश्रेष्ठींच्या आदेशापुढे नमतात, यावर पदवीधरच्या निवडणुकीची लढत अवलंबून असणार आहे. एम. के. देशमुख यांच्या उमेदवारीमागची पार्श्वभूमी पाहिली तर ही अचानक झालेली बंडखोरी नसून गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या तयारीचा परिणाम असल्याचे दिसते.

एम. के. देशमुख कोण आहेत?

एम. के. देशमुख हे निवृत्त शिक्षणाधिकारी आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते शिक्षणाधिकारी पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळीच त्यांचे लक्ष्य मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेत जाण्याचे असल्याचे स्पष्ट झाले होते.

विशेष म्हणजे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार अतुल सावे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी अर्ज मागे घेतला. त्या वेळी भाजपकडून पुढील पदवीधर निवडणुकीत संधी देण्याचे आश्वासन मिळाल्याची राजकीय चर्चा होती.

भाजपने मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी गेल्या वर्षभरापासून तयारी केली होती. मतदार नोंदणीवर विशेष भर देण्यात आला. देशमुख यांनी आजच्या उमेदवारीच्या वेळीही आपण आणि आपल्या समर्थकांनी सुमारे दीड लाख पदवीधर मतदारांची नोंदणी केल्याचा दावा केला आहे.

महायुतीने मराठवाडा पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देत सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या स्थानिक इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाली. देशमुख यांनी मात्र आपण बंडखोरी करत नसल्याचे सांगत 'पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने वर्षभर तयारी केली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मैत्रीपूर्ण लढतीची संधी द्यावी', अशी भूमिका मांडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT