Maval Lok Sabha Constituency News Sarkarnama
पुणे

Maval Lok Sabha Constituency `मावळ`चा खासदार घाटावरचा होणार, पण घाटाखालील मतदार निर्णायक ठरणार !

Uttam Kute

Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात निम्मा-निम्मा असा विभागलेला आहे. त्याचे तीन- तीन विधानसभा मतदारसंघ घाटावर आणि घाटाखाली आहेत. त्यापैकी मतदारसंघातील सर्वात मोठा आणि राज्यात दोन नंबरवर असलेला घाटावरील चिंचवड व त्यानंतरचा घाटाखालील पनवेल हे दोन विधानसभा मतदारसंघ हे मावळचा नवा खासदार कोण हे ठरवणार आहेत.

मावळमध्ये (Maval) 25 लाख 9 हजार 461 मतदार आहेत. त्यात चिंचवड (5 लाख 95 हजार 408) व पनवेल (5 लाख 65 हजार 915) या दोन विधानसभा मतदारसंघाचा वाटा तब्बल 45 टक्के आहे. म्हणजे या दोन मतदारसंघातच 11 लाख 61 हजार 323 मतदार आहेत. हे दोन्ही शहरी मतदारसंघ आहेत. त्यामुळे तेथे मतदानाचा टक्का जास्त राहणार आहे. परिणामी तेथील निर्णायकी मतदार हे नवा खासदार कोण हे ठरविणार आहेत. तूर्तास येथे दुरंगी लढत आहे. त्यातील दोन्ही मुख्य उमेदवार हे आघाडी व युतीचे आहेत. ते घाटावरचे पिंपरी-चिंचवडमधील आहेत. त्यामुळे मावळचा खासदार कोण असेल, हे चिंचवड आणि पनवेल ठरवणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गतवेळी 2019 ला मावळमध्ये 22 लाख 27 हजार 633 मतदार होते.म्हणजे पाच वर्षांत दोन लाख 81 हजार 828 मतदार वाढले आहेत.ते मावळमधील उरण विधानसभेतील मतदार संख्येपेक्षाही (2 लाख 09 हजार 461) जास्त आहेत. आहे. त्यांची भूमिका सुद्धा निर्णायकी असणार आहे. तसेच पहिल्यांदाच मतदान करणारे 24 हजार 278 नवीन मतदारही मावळचा खासदार युतीचे (शिंदे शिवसेना) श्रीरंग बारणे की आघाडीचे (ठाकरे शिवसेना) संजोग वाघेरे-पाटील यापैकी कोण असणार, यात आपला खारीचा वाटा उचलणार आहेत.

चिंचवड, (Chinchwad) पनवेल हे जसे मावळचा खासदार ठरविण्यात निर्णायकी भूमिका बजावणार आहेत, तसाच घाटावरील मावळ, पिंपरी आणि चिंचवड हे तीन विधानसभा मतदारसंघांचाही त्यात सिंहाचा वाटा असणार आहे. कारण मावळमधील 60 टक्के मतदार (15 लाख 30 हजार 857) हे या तीन विधानसभेतील आहेत. एकूणच घाटावरील हे मतदार घाटावरील खासदार करण्यात आपला महत्त्वाचा वाटा उचलणार आहेत.

Edited By : Chaitanya Machale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT