Maval Loksabha Election 2024 Result 
पुणे

Maval Loksabha Election 2024 : मावळमध्ये बारणे आले पण लीड घटलं; 31 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

Loksabha Election 2024 Result News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांचे पक्ष फोडल्याने त्यांच्याविषयी असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फटका लीडच्या दृष्टीने बारणेंना बसाल.

उत्तम कुटे 

Pimpri Chinchwad News : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणास लागलेल्या मावळ लोकसभेत शिंदे शिवसेनेची सरशी झाली. त्यांचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅटट्रिक केली. ते 96 हजार 615 मतांच्या ली़डने निवडून आले.पण,गेल्यावेळपेक्षा त्यांचे लीड तब्बल एक लाख 19 हजार 298 मतांनी घटले.

2014 ला श्रीरंग बारणे (Shrirang Barne) नगरसेवकाचे थेट खासदार झाले. 2012 ला ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2014 ला त्यांनी `शेकाप`कडून लढलेले लक्ष्मण जगताप यांचा एक लाख 57 हजार 397 मतांनी पराभव केला.तर, गेल्यावेळी 2019 मध्ये त्यांनी पार्थ अजित पवारांवर 2 लाख 15 हजार 913 मतांनी दणदणीत विजय मिळवला. आता 2024 ला पुन्हा निवडून येत त्यांनी खासदारकीची हॅटट्रिक केली. मावळमध्ये पहिल्यांदाच ती झाली.पण त्यांचे लीड लक्षणीयरित्या म्हणजे एक लाख 19 हजार 298 ने कमी झाले.

गेल्यावेळी अजित पवारांचे पूत्र पार्थ हे प्रतिस्पर्धी असूनही त्यांचा बारणेंनी दोन लाख १५ हजाराच्या लीडने दणदणीत पराभव केला होता.यावेळी अजित पवार राष्ट्रवादीतून ठाकरे शिवसेनेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेले संजोग वाघेरे-पाटील हे नवखे व पहिल्यांदा लोकसभा लढणारे उमेदवार असूनही त्यांना मागच्यापेक्षा निम्मेही मताधिक्य मिळाले नाही,हे विशेष.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांचे पक्ष फोडल्याने त्यांच्याविषयी असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फटका लीडच्या दृष्टीने बारणेंना बसाल. तर,त्याचा फायदा वाघेरेंना मतवाढीच्या दृष्टीने झाला.गेल्यावेळचे निवडणूक चिन्ह कायम असूनही बारणेंचे लीड मोठ्या प्रमाणात कमी झाले.तर,त्याउलट नवीन चिन्ह घेऊनही वाघेरेंनी सहा लाख मते घेतली. ती पार्थ पवारांपेक्षा एक लाखाने जास्त आहेत.

यावेळी 2024 ला मावळमध्ये 14 लाख 2 हजार 641 जणांनी मतदान केले. त्यापैकी बारणेंना 6 लाख 92 हजार 832 मते मिळाली. 2019 ला त्यांना 7 लाख वीस हजार 663 मते मिळाली होती. यावेळी दोन लाख 28 हजार 892 ने जास्त मतदान होऊनही बारणेंना 2019 पेक्षा 27 हजार 831 मते कमी मिळाली. त्यांच्या मतांच्या टक्केवारीतच नाही,तर मताधिक्यातही गेल्यावेळपेक्षा मोठी घट झाली.यावेळी 33 उमेदवार मावळच्या रिंगणात होते.त्यातील वाघेरे सोडून बाकीच्या 31 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. 16 हजार 760 मतदारांनी `नोटा`चा पर्याय निवडला.तर, 254 मते बाद झाली.

वंचित मतापासून वंचितच राहिली

2019 ला मावळमध्ये वंचितचे उमेदवार राजाराम पाटील यांनी 75 हजार 904 एवढी मते खेचली होती. ते त्यावेळी तिसऱ्या नंबरवर राहिले. 2024 ला त्यांनी बहूजन समाज पार्टीकडून निवडणूक लढवली अन त्यांच्य़ा मतात मोठी घट झाली. त्यांना अवघी 14 हजार तीन मते मिळाली. ते चौथ्या क्रमांकावर राहिले.

तर,त्यांचा गतवेळचा तिसरा क्रमांक यावेळीही वंचितच्याच उमेदवाराने पटकावला.त्यांच्या माधवी जोशी यांना 27 हजार 768 मते पडली. ती गेल्यावेळच्या वंचितचे पाटील यांच्यापेक्षा कितीतरी कमी आहेत. यावेळी एमआयएमच्या वंचित बहूजन आघाडीशी नसलेल्या युतीचा फटका त्यांना येथे बसला. तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे खासदार उमेदवार इम्तियाज जलिल यांनाही वंचितशी असलेली युती तुटल्याचा तोटा झाला.त्यांचा पराभव झाला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT