Vadgaon Maval Sarkarnama
पुणे

Vadgaon Maval: बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत खळबळ, आमदार शेळके संतापले; १३ सदस्यांचे टेन्शन वाढलं

Maval Market Committee News: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सलग यश मिळवणाऱ्या राष्ट्रवादीला स्वपक्षातीलच बंडखोरीमुळे नामुष्की पत्करावी लागल्याने पक्ष नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली.

सररकारनामा ब्युरो

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे: मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत स्पष्ट बहुमत असूनही सभापती-उपसभापती निवडणुकीत झालेल्या धक्कादायक पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षातील सहा मते फुटल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाल्यामुळे आमदार सुनील शेळके यांनी संतप्त होत पक्षाच्या सर्व १३ सदस्यांना तातडीने राजीनामे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

बाजार समितीच्या १८ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आणि काँग्रेस (आय)चा १ असे १३ सदस्यांचे स्पष्ट बहुमत असताना भाजपचे केवळ ५ सदस्य आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या सभापती व उपसभापती निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला ११ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला केवळ ७ मतांवर समाधान मानावे लागले. पक्षातील सहा सदस्यांनी विरोधी उमेदवाराला साथ दिल्याने हा पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सलग यश मिळवणाऱ्या राष्ट्रवादीला स्वपक्षातीलच बंडखोरीमुळे नामुष्की पत्करावी लागल्याने पक्ष नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली. आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे,आणि तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीत आमदार शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, सर्व सदस्यांनी तातडीने राजीनामे द्यावेत, अन्यथा पक्षशिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. भविष्यात पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर भूमिका घेतली जाईल, असे संकेतही पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आले.

बैठकीला नामदेव शेलार, ॲड. भरत ऊर्फ साहेबराव टकले, मारुती वाळुंज, दिलीप ढोरे, विलास मालपोटे, विक्रम कलवडे, अमोल मोकाशी, नथुराम वाघमारे, विलास मानकर, शंकर ऊर्फ बाळासाहेब वाजे, सुप्रिया मालपोटे आणि अंजली जांभुळकर हे संचालक उपस्थित होते. आता या आदेशानंतर प्रत्यक्षात किती सदस्य राजीनामे देतात, याकडे मावळच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या आदेशाने संचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून किती जण हा आदेश पाळतील आणि राजीनामा देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भविष्यात पक्षांमध्ये गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत आमदार शेळके व तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिले आहेत.

राजीनामे नाही दिले तर पक्षातून हकालपट्टी

संचालकांच्या बैठकीत आमदार सुनील शेळके म्हणाले तुम्हाला उमेदवार मीच देतो, पैसे मीच खर्च करतो, तरी पक्षाबरोबर गद्दारी करता. कोणत्या सदस्यांनी विरोधी मतदान केले, कुणी पैसे घेतले मला माहीत आहे. मला त्या खोलात जायचे नाही. तुम्ही पक्षाला मानत असाल तर 13 सदस्यांनी राजीनामे द्या, राजीनामे न दिल्यास पक्षातून हकालपट्टी केली जाईल, तसे आदेश तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांना आमदार सुनील शेळके यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT