Sanjog Waghere Patil  sarkarnama
पुणे

Maval Lok Sabha constituency : ठाकरे गटासाठी आश्वासक चेहरा म्हणून संजोग वाघेरे पाटील यांचाच पर्याय

Maval Political News : संजोग वाघेरे यांचा सर्वच पक्षात चांगला संपर्क आहे. लोकांमध्ये काम करणारे राजकारणी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. ते कधीही कुठल्या वादात अडकले नाहीत.

Roshan More

Lok Sabha Election 2024 : शिवसेनेते फूट पडल्यानंतर मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे गटासोबत गेले. त्यामुळे मावळमध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार हे निश्चित मानले जात होते. शिंदे गटाकडे श्रीरंग बारणे यांची उमेदवार पक्की समजली जात असताना ठाकरे गटाचा उमेदवार कोण, याची उत्सुकता होती. त्यामुळे बारणेंना त्यांच्याच मतदारसंघात पराभूत करेल, असा चेहरा म्हणजे संजोग वाघेरे पाटील यांना ठाकरे गटाकडून हेरण्यात आले. राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या संजोग वाघेरे यांचा डिसेंबर महिन्यात शिवेसनेत (ठाकरे गट) प्रवेश घडवून आणण्यात आला. डिसेंबरमध्ये संजोग वाघेरे हे ठाकरे गटात आले असले तरी निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी खूप आधीपासूनच सुरू केली होती.

संजोग वाघेरेंना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळालेला आहे. त्यांचे वडील भिकू भिमाजी वाघेरे पाटील हे पिंपरी गावाचे सरपंच. पुढे ते महापौर देखील बनले. वाघेरे घराण्याचे नाव पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आदरपूर्वक घेतले जाते. संजोग वाघेरे हे 35 ते 40 वर्षे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहेत. नगरसेवकपदापासून सुरू झालेला प्रवासात त्यांनी महापौर, पीसीएमटीचे सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद आदी पदे भूषवली आहेत.

संजोग वाघेरे यांच्या पत्नीसुद्धा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहेत. माजी नगरसेवक, स्थायी समितीच्या अध्यक्ष तसेच महापालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. 2014 आणि 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजोग वाघेरे हे लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. मात्र, 2019 मध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यावेळी वाघेरे यांनी माघार घेतली होती. मात्र, यावेळी निवडणूक लढण्याचे निश्चित करत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. खुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना उमेदवारीबाबत शब्द दिल्याचे सांगण्यात येते. संजोग वाघेरे पाटील यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.

संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांचा सर्वच पक्षांत चांगला संपर्क आहेत. लोकांमध्ये काम करणारे राजकारणी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. ते कधीही कुठल्या वादात अडकले नाहीत. टीका करतानाही पातळी सोडत नाहीत. मूळचे कबड्डीपट्टू असलेले संजोग वाघेरे पाटील राजकारणातही खिलाडूवृत्ती जोपासतात. पिंपरी-चिंचवडच्या विकासात वाघेरे घराण्याच्या योगदानाची चर्चा नेहमीच होत असते. विकासकामांवर भरवसा असणारे संजोग वाघेरे हे 2014 पासून लोकसभेसाठी इच्छुक होते. त्या दृष्टीने त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे. त्याचा फायदा त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत होईल.

नाव (Name)

संजोग भिकू वाघेरे पाटील

जन्म तारीख (Birth date)

24 ऑगस्ट 1965

शिक्षण (Education)

12 वी

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

संजोग वाघेरे पाटील यांचा जन्म सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाला. वडील भिकू वाघेरे पाटील हे पिंपरी गावचे सरपंच होते. ते पुढे पिंपरी चिंचवडचे महापौर झाले. आई आनंदीबाई वाघेरे या गृहिणी होत्या. संजोग वाघेरे यांना एक भाऊ, दोन बहिणी, दोन मुली, एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे या सलग 15 वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका होत्या. स्थायी समिती अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. वाघेरे पाटील कुटुंबाकडून कै. भिकू भिमाजी वाघरे पाटील प्रतिष्ठानमार्फत सामाजिक उपक्रम राबवले जातात.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

व्यवसाय

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

मावळ

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

संजोग वाघेरे पाटील यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. वडील सरपंच होते. पुढे ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर देखील झाले. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. वडील भिकू वाघेरे यांच्या निधनानंतर वयाच्या 22 व्या वर्षी संजोग वाघेरे हे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतरच्या निवडणुकीत देखील ते नगरसेवक झाले. त्यांनी पिंपरी-चिंचवड परिवहन समितीचे सभापती, महापौर अशी पदे भूषवली. त्यानंतर त्यांच्या पत्नी 2007 ते 2022 अशा सलग 15 वर्षे नगरसेविका होत्या. त्यांनी स्थायी समिती सदस्य, स्थायी समिती अध्यक्षपद भूषवले आहे. संजोग वाघेरे हे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत 2002 मध्ये विजयी झाले. 2014 मध्ये सत्तांतर झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील अनेकांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये जाणे पसंत केले. मात्र, संजोग वाघेरे अजित पवार, शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले. पडत्या काळात त्यांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी घेत पक्षाला उभारी देण्याचे काम केले. 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढण्याची संजोग वाघेरे यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी तयारी देखील केली होती. मात्र, पक्षाने आधी राहुल नार्वेकर आणि नंतर पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांची संधी हुकली.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

संजोग वाघेरे हे उत्तम कबड्डीपटू आहेत. सुरुवातीला त्यांची ओळख राज्यस्तरावरील खेळाडू म्हणून होती. खिलाडूवृत्ती त्यांच्या नसानसांत भिनलेली आहे. तरुण वयातच राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. तेव्हापासूनच त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. ते कै. भिकू भिमाजी वाघेरे पाटील प्रतिष्ठानमार्फत सामाजिक, कला, क्रीडा, व्यापार, सहकार, साहित्य, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रात योगदान देणाऱ्या सामाजिक संस्थांना, व्यक्तींना सर्वतोपरी मदत करतात. दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना प्रतिष्ठानच्या माध्यमातून 'पिंपरी चिंचवड भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी अनाथाश्रम, वृद्धाश्रमातील गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते. कर्करोगग्रस्त रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम सातत्याने केले जाते. युवकांच्या विचारांना दिशा मिळावी म्हणून व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय स्तरावर अनेक उदयोन्मुख खेळाडूना संधी मिळावी म्हणून स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. महापौर कुस्ती, हॉकी या सारख्या स्पर्धा आयोजित करून त्यांनी खेळाडूंना नेहमीच पाठबळ दिले आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी जवळपास ७० हून अधिक बचतगटांची स्थापना केली. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कामगारांच्या प्रश्नांवर देखील त्यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी आंदोलने केली आहेत. 2017 मध्ये त्यांनी कामगार परिषदेचे आयोजन केले होते.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

निवडणूक लढवली नव्हती

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

निवडणूक लढवली नव्हती

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात संजोग वाघेरे हे गेली 40 वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांचा समाजातील सर्व वर्गांमध्ये संपर्क चांगला आहे. मावळ मतदारसंघाचा आकार पाहता हा देशातील सर्वात मोठ्या मतदरासंघांपैकी आहे. त्यामुळे या मतदारसंघात शहरी भागांसह ग्रामीण भागातही चांगला संपर्क असणे आवश्यक आहे. वाघेरे हे 2014 पासून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही ते संपर्क ठेवून आहेत. मात्र, राष्ट्रवादी असताना त्यांच्याकडे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्षपद होते. त्यामुळे ग्रामीण भागातील संपर्कासाठी त्यांना काही मर्यादा होत्या. ग्रामीण भाग तसेच रायगड जिल्ह्यातील भागात संपर्क वाढवण्यासाठी त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

वाघेरे हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहेत. विविध राजकीय नेत्यांची जयंती, त्यांचे वाढदिवस याचे शुभेच्छा संदेश ते आपल्या फेसबुकवरून देत असतात. मतदारसंघात त्यांच्या भेटीगाठी विषयीची अपडेटसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली जाते. मात्र, राजकीय वाद, टीका टिपण्णी मात्र ते सोशल मीडियाच्या त्यांच्या अकाऊंटवर करत नसल्याचे दिसून येते. शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केल्यानंतर त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट जास्त सक्रिय झाल्याचे दिसून येते.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, अजित पवार

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. गेल्या १५ वर्षांपासून येथे शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. गजानन बाबर यांच्यानंतर श्रीरंग बारणे हे या मतदारसंघाचे नेतृत्त्व मागील दहा वर्षांपासून करत आहेत. शिवसेनेत फूट पडली असली तरी ठाकरेंना मानणारा मतदार या मतदारसंघात आहे. रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे. हा पक्ष महाविकास आघाडीसोबत असल्याने रायगडमधून संजोग वाघेरे यांना चांगली ताकद मिळेल. पिंपरी-चिंचवड शहरात देखील संजोग वाघेरे यांचा चांगला जनसंपर्क आहे. शिवाय सर्वच पक्षांत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्यांना इतर पक्षांतून छुपी मदत होण्याची अधिक शक्यता आहे. संजोग वाघेरे हे वादग्रस्त विधाने, वक्तव्यांपासून दूर असतात, त्यामुळे त्यांची प्रतिमा जनमाणसांत चांगली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचा शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यामुळे बारणे यांना उमेदवारी मिळाली तर मावळच्या विधानसभा मतदारसंघातून देखील वाघेरे यांना छुपी मदत होऊ शकते.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

शिवसेनेत फूट पडल्याने शिवसेनेची ताकद विभागली गेली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, कर्जत आणि उरण या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या विधानसभा मतदारसंघांवर भाजप आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) वर्चस्व आहे. डिसेंबर 2023 मध्ये वाघेरे यांनी शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण मतदारसंघात पोहचण्यासाठी कमी कालावधी मिळतो आहे. पिंपरी-चिंचवड शहर भागात वाघेरे हे सर्वपरिचित आहेत. मात्र, ग्रामीण भागात विशेषतः रायगड जिल्ह्यातील भागात त्यांना कमी कालवाधीत पोहचणे हे आव्हान असेल. मतदारसंघात भाजपच्या मित्रपक्षांची ताकद आहे. तशी ताकद राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेसची नसल्याचे दिसून येते.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

संजोग वाघेरे पाटील यांना शिवसेना (ठाकरे गट) प्रवेशावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. पक्षात प्रवेशानंतर यांना मावळ लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना संघटक पद देखील देण्यात आले. प्रवेशाच्या दुसऱ्या दिवसापासूनच वाघेरे यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. 2014 आणि 2019 मध्ये लोकसभेसाठी इच्छुक असूनही राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिले नव्हते. मात्र, ते पक्षासोबत कायम राहिले. आता शिवसेनेनेही (ठाकरे गट) त्यांना उमेदवारी नाकारली तरी ते पक्षासोबतच कायम राहतील, अशी स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT