N.K.Patil  Sarkarnama
पुणे

N K Patil Suspended : मद्यधुंदपणा अन् महिलांशी असभ्य वर्तन भोवलं, तळेगाव-दाभाडेचे मुख्याधिकारी एन.के पाटलांचं निलंबन !

Talegaon Dabhade Municipal Council : गेल्या महिन्यात 1 जूनला एन.के.पाटील यांनी धोकादायक पद्धतीने चारचाकी गाडी चालवत तळेगाव परिसरातील दोन वाहनांना धडक दिली होती. पोलिसांच्या तपासात त्यांनी मद्याचे सेवन केले असल्याचे समोर आले होते.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील यांना मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवणं, महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे भोवलं आहे.राज्याचे उप सचिव अनिरुध्द जेवळीकर यांनी पाटील यांचे निलंबन करण्याचे आदेश काढले आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तनाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांबरोबरच सहकारी कर्मचाऱ्यांकडून देखील याबाबत वारंवार तक्रारी विनंती अर्ज करण्यात येतात. मात्र त्याची दखल फारशी घेतली जात नाही. या प्रकरणांमध्ये सरकारने दखल घेत कडक पावले उचलत अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे .

गेल्या महिन्यात 1 जूनला एन. के. पाटील यांनी धोकादायक पद्धतीने चारचाकी गाडी चालवत तळेगाव परिसरातील दोन वाहनांना धडक दिली होती. तपासात त्यांनी मद्याचे सेवन केले असल्याचे निदर्शनास आले होते. तसा रिपोर्ट न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेतून पोलिसांना मिळाले होते.

यासोबतच मुख्याधिकारी असलेले एन. के. पाटील यांचे महिला कर्मचारी व अधिकारी यांच्यासोबत असलेले वागणे हे अशोभनीय व असभ्यपणाचे असल्याचे पुणे जिल्हाधिकारी (Collector ) यांनी नगरपरिषद प्रशासन विभागाला कळविले होते.पाटील यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि त्याच्या वर्तणुकीचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला होता. या अहवालाच्या आधारे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याने त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील यांच्या विरोधात स्थानिक नागरिक, नगर परिषदेतील कर्मचारी आणि काही सामाजिक संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पाटील यांची एक डिसेंबरला 2023 ला पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुदतपूर्व बदली करण्यात आली होती. मात्र, पाटील यांनी त्याबाबत 'मॅट'मध्ये आव्हान देत ही बदली रद्द करून घेतली आणि ते पुन्हा आठवडाभरातच मूळ पदावर रुजू झाले होते.

आमदार शेळके मांडणार होते लक्षवेधी

मावळचे (Maval) आमदार सुनील शेळके देखील पाटील यांच्या वादग्रस्त कारकिर्दीबद्दल विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निलंबन झाले आहे. पुढील आदेश निघेपर्यंत पाटील हे निलंबित राहणार असून या कालावधीत पाटील यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रहावे लागणार आहे.

पूर्वपरवानगी शिवाय जिल्हाधिकारी कार्यालय सोडण्यास त्यांना सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच या कालावधीत खासगी नोकरी अथवा कोणताही व्यवसाय करण्यास बंदी आहे. तसे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच निर्वाह भत्ता मिळण्याचा हक्क ते गमावणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT