पुणे

Devdatta Nikam : दूध भेसळ प्रकरण तापलं! 'आका'चा शोध घ्या, रॅकेटचा पर्दाफाश करा : शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्याची मागणी

Demand to investigate milk adulteration mastermind : दूध भेसळ प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी केली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

डी. के. वळसे पाटील

डी. के. वळसे पाटील

मंचर परिसरात उघडकीस आलेल्या कथित दूध भेसळ प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा. तसेच या प्रकरणामागील 'आका' कोण आहे, याचा शोध घ्यावा. पुतण्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक विष्णू हिंगे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली.

मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.७) झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, राजाराम बाणखेले, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, सचिन बांगर, प्रवीण थोरात, नगरसेवक वसंतराव बाणखेले, प्रशांत अभंग, अजित चव्हाण, निलेश वळसे, विशाल वाबळे, गणेश यादव, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

निकम म्हणाले, "अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे प्रत्येक गावातून निवेदने पाठवावीत. दूध भेसळ प्रकरणाचा सर्वंकष तपास होऊन यामागील संपूर्ण साखळी उघड झाली पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा विषय विधिमंडळात उपस्थित करावा.

बुधवारी(ता.८) सकाळी दहा वाजता मोर्चाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीपासून होणार आहे. लक्ष्मी रस्ता मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुढील आंदोलनाची दिशा याच मोर्चात ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगे यांनी आरोप फेटाळले :

दूध भेसळ प्रकरणातील आरोपी माझा पुतण्या असला, तरी माझा कोणताही आर्थिक अथवा व्यावसायिक संबंध नाही.असे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक विष्णू हिंगे यांनी सांगितले. प्रशासन या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करून कारवाई करत असून, या घटनेचे राजकारण करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच निकम यांनी केलेल्या आरोपांबाबत मी लवकरच सविस्तर भूमिका मांडणार आहे," असेही हिंगे यांनी स्पष्ट केले.

देवदत्त निकम यांनी आपल्या राजीनाम्याची केलेली मागणी फेटाळताना हिंगे म्हणाले, "निकम यांच्या चुलत भावाविरुद्ध बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधींना विधिमंडळात उपस्थित करण्याविषयी विनंती का केली नाही? तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाचा राजीनामा का दिला नाही? याचे उत्तर त्यांनी प्रथम जनतेला द्यावे, अशी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT