Abdul Sattar  Sarkarnama
पुणे

Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तारांचं मोठं विधान; म्हणाले, 'पुणे बाजार समितीतील कोट्यवधींचा घोटाळाच मी...'

सरकारनामा ब्यूरो

प्रवीण डोके-

Pune News : राज्यात एकीकडे अॅम्ब्युलन्स घोटाळ्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. यात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याचवेळी आता सरकारमधील मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळ्यावरून सूचक विधान केले आहे.

पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुण्यात पणन मंडळाच्या वतीने मिलेट महोत्सवाच्या उद्घाटनानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. या पत्रकारपरिषदेत त्यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळ्यावरदेखील भाष्य केले आहे. ते म्हणाले, बाजार समितीतील कोट्यवधींचा घोटाळा मी स्वत: उघड केला आहे. त्यामुळे याबाबतची चौकशी गुंडाळण्याचा अथवा आजी माजी संचालकांना संरक्षण देण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे संचालक मंडळावर कारवाई होणारच असल्याचा पुनरुच्चार पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

सत्तार म्हणाले, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील (Pune Market Committee) 5 ते 6 संचालकांच्याबाबतीत मुलाणी समितीने जो निर्णय दिला होता. त्याप्रमाणे संचालकांविरुद्ध मी निर्णय घेतला आहे. याबाबतचा पुढचा निर्णय सरकारने घेईल. मी भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण देण्याचे काम करीत नाही. जी सत्य परिस्थिती होती त्यावर आधारितच निर्णय दिला आहे़.

जिल्हा उपनिबंधकांना 60 दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. मात्र 90 दिवस होऊनही त्यांनी निर्णय दिला नाही. त्यामुळे ही चौकशी गुंडाळली असल्याची चर्चा बाजार समिती आणि पणनच्या वर्तुळात सुरू आहे. या चर्चांवर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, चौकशी गुंडाळली असती तर गुंडाळल्यासारखा निर्णय दिला असता. मात्र, पुणे बाजार समितीमध्ये जे जे चुकीची कामे करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. संचालकांना मी संरक्षण दिले असते तर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सिद्धच झाला नसता. निर्णय देताना मलाही अनेक अडचणी आल्या, मात्र सत्य बोलावे लागते, सत्य करावे लागते, या युक्तीप्रमाणे मी जे सत्य आहे ते केले, असेही सत्तार यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निर्णयाचे इतिवृत्त देण्याची सूचना

बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे. या ठिकाणी आपण काही चुकीची कामे करतो का, काळे धंदे करतो का, असा सवाल उपस्थित करीत संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यास तसेच इतिवृत्त देण्यास काय अडचण आहे, अशा शब्दांत संचालक मंडळावर ताशेरे ओढले. याचवेळी त्यांनी तुम्ही पारदर्शक काम करीत असाल, तर इतिवृत्त देण्यास का घाबरता, तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का ? असा खडा सवालही केला.यावेळी त्यांनी इतिवृत्त देण्याच्या सूचना सत्तार यांनी बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांना दिल्या.

जिल्हा उपनिबंधकांवर कारवाईचा इशारा

मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी जो निर्णय दिला आहे, तो तपासून घ्या, असे सांगत मुलाणी समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास तसेच दिरंगाई केल्यास जिल्हा उपनिबंधकांवरही कारवाई करण्याचा इशाराच त्यांनी दिला. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक याबाबतचा निर्णय तातडीने घेणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT