Adam Mastar : रे-नगरमुळे माझं डिपॉझिट जप्त झालं होतं : आडममास्तरांनी सांगितली 'ती' आठवण!

Ray Nagar News : जाणून घ्या, प्रकल्पपूर्तीच्या पार्श्वभूमीवर 'सरकारनामा'शी बोलताना नेमके काय म्हणाले आहेत.
Comrade Adam Master
Comrade Adam MasterSarkarnama

Solapur News : सोलापूर शहरातील असंघटित कामगारांसाठी आशेचा किरण समजला जाणारा देशातील सर्वात मोठा कामगार वसाहत प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. तब्बल 30000 घरांच्या रे-नगर प्रकल्पातील तयार असलेल्या 15000 घरांचे हस्तांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी 2024 रोजी केले जाणार आहे.

यूपीए -2 सरकारच्या काळात सुरुवात झालेल्या या प्रकल्पाच्या इतिहासामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. यामधील एक किस्सा म्हणजे ज्यांच्या दूरदृष्टीतून हा रे-नगर प्रकल्प साकारला, त्या कॉम्रेड आडममास्तर यांचे याच प्रकल्पामुळे विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले होते, याची आठवण स्वत: आडममास्तर यांनी या प्रकल्पपूर्तीच्या पार्श्वभूमीवर 'सरकारनामा'शी बोलताना सांगितली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Comrade Adam Master
Solapur: दिव्यांग महिलेनं मागितलं होतं घर अन् साकारला 30000 घरांचा प्रकल्प...!

रे-नगर प्रकल्पाची कल्पना सुचली ते एका दिव्यांग महिलेला घर मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नातून. सुरुवातीला 2011 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील असंघटित कामगारांना स्वस्तात घरे मिळवून देण्यासाठी आडममास्तर यांनी माकपचे नेते सीताराम येचूरी यांच्या नेतृत्वात तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली. त्यांच्यापुढे कामगारांसाठीच्या 30000 घरांचा प्रस्ताव मांडला. मात्र सुरुवातीला निष्फळ झालेली या प्रकल्पाची चर्चा अजय माकन यांच्या प्रयत्नातून पुढे सरकली आणि केंद्र सरकारने 4500 घरांच्या पायलट प्रोजेक्टला मंजुरी दिली.

यामध्ये केंद्र सरकारने घरांसाठी अनुदान देण्याचे निश्चित केले. मात्र या प्रकल्पासाठी लागणारी जागा कामगार संघटनेने उपलब्ध करून देण्याचे ठरले. यावर एकमत होऊन आडममास्तर यांच्या शिष्टमंडळाने पुढील प्रक्रिया सुरू केली. या योजनेसाठी केंद्रसरकारकडून राजीव आवास योजनेतून 2.5 लाख रुपये मिळणार होते.

राज्य सरकारकडून या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कामगारांना अनुदान मिळावे, म्हणून प्रयत्न केले असता, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने 1.5 लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (सध्या या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 1.5 लाख, राज्य सरकारकडून 1 लाख आणि 50 हजार कामगारांचा वाटा, तर उर्वरित 2.25 लाखांचे कर्ज असा खर्च केला जात आहे.) या गोष्टीमुळे या प्रकल्पाची पुढील वाटचाल सुरू होणार होती, मात्र येथून पुढे खरा राजकीय खेळ सुरू झाल्याचे आडममास्तर म्हणाले.

Comrade Adam Master
Sharad Pawar : शरद पवारांच्या सभेत चर्चा ‘बनवाबनवी’मधील धनंजय मानेंची... नेमकं काय घडलं?

अंसघटित कामगारांच्या रे-नगर प्रकल्पासाठी राजीव गांधी आवास योजना सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना करून केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे 200 एकर जागा खरेदी करण्यात आली. यासाठी प्रत्येक कामगाराकडून 100 रुपयांत सभासदनोंदणी आणि जागेसाठी 6000 रुपये रक्कम गोळा करून जागेचा खर्च भागवला होता. केंद्र सरकारने 31 मे 2013 मध्ये 4500 घरांचा पायलट प्रोजेक्ट म्हणून संमती देत त्याचा आदेश जारी केला.

त्यावेळी वर्षभरात म्हणजे 2014 ला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार होत्या. त्यामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) आणि त्यांची कन्या प्रणिती यांनी राजीव आवास योजनेतील कामगार वसाहतीच्या प्रकल्पाला विरोध सुरू करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आडममास्तर यांनी केला. कारण आडममास्तर हे सोलापूर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी अडथळा ठरू शकत होते.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव -

आडममास्तर म्हणाले, की सुशीलकुमार शिंदे हे केंद्रात मंत्री होते. त्यांची मुलगी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या सोलापूर मध्य मतदारसंघाच्या आमदार होत्या. त्यामुळे जर रे-नगरचा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर याचे श्रेय मला मिळेल आणि त्याचा फटका प्रणिती यांना बसणार. या विचारातून सुशीलकुमार शिंदे यांनी त्यावेळी रे-नगर प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून जे 1.5 लाख रुपयांचे अनुदान देण्याचे निश्चित केले होते त्या अनुदानाच्या फाईलवर अंतिम सही करू नये, म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव आणला.

तसेच हा प्रकल्प रखडवत ठेवण्याच्या सूचना केल्या गेल्याचा आरोप आडम यांनी केला. परिणामी मुख्यमंत्र्यांनी अनुदानाच्या अंतिम प्रस्तावावर सही न केल्यामुळे ती फाईल मुख्यमंत्री कार्यालयातच अडकून पडल्याचेही कॉम्रेड आडम म्हणाले.

प्रणिती शिंदेंनी काढला मोर्चा

पुढे 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापुरात काँग्रेसकडून रे-नगर या प्रोजेक्टच्या विरोधात प्रचार सुरू करण्यात आला. हा प्रकल्प पूर्ण होणार नाही. आडममास्तर यांनी घरांच्या नावाने कामगारांची लूट केली आहे. आडम (Adam Mastar) यांनी 25 ते 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसनेत्यांकडून केला जाऊ लागला. एवढेच नाही तर या प्रकरणावर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

यामुळे पुढे या प्रकल्पाविरोधात उलटसुलट चर्चा आणि कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यात काँग्रेस आणि विरोधक यशस्वी झाले. त्याचदरम्यान नोव्हेबर 2013 मध्ये प्रणिती शिंदे यांनी आडममास्तर यांच्याविरोधात मोर्चा काढला, या मोर्चामध्ये गृहनिर्माण योजनेसाठी गोळा केलेले कामगारांचे पैसे परत द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

रे-नगर प्रकल्पाच्या विरोधातील प्रचाराचा प्रभाव -

पुढे 2014 मध्ये निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत आडममास्तर हेदेखील सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवत होते. मात्र अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या रे-नगर प्रकल्पाच्याविरोधातील प्रचाराचा प्रभाव या निवडणुकीत कामगारवर्गावर दिसून येऊ लागला. त्यातच रे-नगर प्रकल्पाची एक वीटही रचली गेली नव्हती. त्यामुळे पैसे भरलेल्या लाभार्थ्यांमध्ये कॉम्रेड आडम यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला आणि त्याचाच फटका मास्तरांना या निवडणुकीत बसला.

मास्तर या निवडणुकीत पराभूत झाले. या निवडणुकीत प्रणिती शिंदे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांना या निवडणुकीत 46,907 प्रथम क्रमांकाची मते मिळाली, तर आडम मास्तर हे 13,904 अशी चौथ्या क्रमांकाची मते घेऊन पराभूत झाले होते. परिणामी या निवडणुकीत आडम यांचे डिपॉझिट जप्त झाले असल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. पुढे केंद्राप्रमाणे राज्यातही सत्तांतर झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने रे-नगर प्रकल्प मार्गी लागला असल्याचेही आडममास्तरांनी स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com