Murlidhar Mohol  Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol News : मंत्री अण्णा लागले कामाला; बैठकीत घेतले 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय

Bjp Political News : मोहोळ यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पुण्याशी निगडित महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. ही जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आलेले मुरलीधर मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये आले असून पुण्याच्या प्रश्नांबाबत त्यांनी रविवारी बैठका घेतल्या.

हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी स्वीकारल्यानंतर पुण्याशी निगडित महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये अनेक दिवस प्रलंबित असलेले पुण्याचे नवे टर्मिनल कार्यान्वित करणे, अपघातग्रस्त विमान ‘बे’वरून हटविणे आणि विमान तळाचे विस्तारीकरण करण्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन तातडीने करण्याच्या दृष्टिकोनातून बैठकीत चर्चा करण्यात आली. (Murlidhar Mohol News)

याबाबत माहिती देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या 35 एकर जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या निधी पैकी 60 टक्के निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. उर्वरित 40 टक्के रक्कम ही पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे भूसंपादन राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार असून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठका घेऊन कारवाईला गती देण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच नव्या टर्मिनलच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात अशी अपेक्षा मोहोळ यांनी व्यक्त केली.

धावपट्टीच्या विस्तारीकरण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय विमान पुण्यातून सुटण्यास सुरुवात होईल. त्याचा फायदा पुणेकरांना होणार असून त्यामुळे या कामाला गती देण्याचा प्रयत्न आमच्याकडून करण्यात येत आहे.

'बे’वर रखडलेल्या ‘त्या’ विमानाचा प्रश्न लवकरच मार्गी !

‘पुणे विमानतळाच्या ‘बे’वर एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान जागेवर उभे असल्याने त्याचा ताण इतर विमानांच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. शिवाय ही बे वापरात नसल्यामुळे विमानांचे वेळापत्रक कोलमडत असल्याचे चित्र आहे. हे विमान दुरुस्तीसाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता असून, ते विमान तात्पुरत्या स्वरुपात संरक्षण दलाच्या जागेवर हलविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्त विमान संरक्षण दलाच्या जागेत लावण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Sinh) यांच्याशी चर्चा झाली आहे,’ अशी माहितीही मोहोळ यांनी दिली.

SCROLL FOR NEXT