Ashok Pawar Sarkarnama
पुणे

महाविकास आघाडी झाल्यास आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार!

विधानसभेपासून सुसाट सुटलेल्या बलाढ्य राष्ट्रवादीला टक्कर देण्यास भारतीय जनता पक्षांसह विरोधकांकडे सध्यातरी पुरेसे बळ दिसत नाही.

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : जिल्हा परिषद (ZP) -पंचायत समिती (Panchayat Samiti) निवडणूकांचे पडघम वाजू लागताच शिरूर (Shirur) तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेच्या सातपैकी सहा आणि पंचायत समितीवर १४ पैकी आठ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (ncp) वर्चस्व आहे. विधानसभेपासून सुसाट सुटलेल्या बलाढ्य राष्ट्रवादीला टक्कर देण्यास भारतीय जनता पक्षांसह (BJP) विरोधकांकडे सध्यातरी पुरेसे बळ दिसत नाही. उलट महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) झाल्यास शिवसेना (Shivsena) आणि कॉंग्रेसला (Congress) काही जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे तेथील तगडे इच्छूक आणि हमखास निवडून येणाऱ्या नेत्याला थांबवणे, ही आमदार अशोक पवार (Ashok Pawar) आणि राष्ट्रवादीची डोकेदुःखी ठरणार आहे. (MLA Ashok Pawar, NCP's headache will creat if Mahavikas Aaghadi)

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण सात जागांपैकी सहा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत, तर पंचायत समितीतही राष्ट्रवादी आठ, भाजप तीन, अपक्ष दोन व शिवसेना एक असे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीला तोडीस तोड यंत्रणा उभी करणारे माजी आमदार बाबूराव पाचर्णे हे आजारपणामुळे, टोकाचा विरोध करून धांदल उडविणारे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल हे तुरुंगात असल्याने आणि विरोधी बारी चौखूर उधळविणारे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष निवृत्तीअण्णा गवारे हे वयोमानामुळे जखडले गेल्याने मूळातच विरोधी पाया खिळखिळा झाला आहे.

आपापला सवता सुभा तयार करून तो कडेकोट करणाऱ्या आणि गटनिहाय सरदारकी करणाऱ्या नेत्यांची तडाखेबंद फौज जशी राष्ट्रवादीकडे आहे, त्या तुलनेत विरोधकांकडे भक्कम नेतृत्वाची वानवा आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी बाजू ताकदीने उचलून धरताना विरोधक व विशेषतः भाजप नेते पक्षीय पातळीवर काय आराखडे ठरविणार, यावर आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीतील रणधुमाळी अवलंबून आहे.

या निवडणूकीत महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यास, भाजपविरोधात सारे एकवटतील, असे चित्र आहे आणि अपयशी ठरल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात सर्व पक्षीय विरोधकांची आघाडी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. महाविकास आघाडीचा प्रयोग करताना शिवसेना आणि कॉंग्रेसला काही जागा देणे अपरिहार्य आहे. त्या देताना आपल्या तेथील प्रबळ इच्छूकाला किंवा हमखास निवडून येण्याची खात्री असलेल्या दमदार नेत्याला खाली बसायला लावणे, ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची सारी सूत्रे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हाती असली तरी शिरूर तालुक्यातील ३९ गावे आंबेगाव मतदार संघाला जोडलेली असल्याने आणि त्या भागात जिल्हा परिषदेचे आठपैकी तीन गट असल्याने त्या भागातील नेतृत्वालाही आमदारांना चुचकारावे लागणार आहे. या ३९ गावांतील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या निष्ठा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी घट्ट असल्याने तिकीट वाटपासून वळसे पाटील यांचे सल्ले आणि सूचनांचा आदर आमदार पवार यांना ठेवावा लागणार आहे.

माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार व शंकर जांभळकर यांनी ३९ गावांतील आपापले गट मजबूत केले असताना शिरूर मतदार संघात मात्र आमदार पवार यांच्या तुलनेत विशेष प्रभाव कुणाचा जाणवत नाही. विरोधी आघाडीतील भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, माजी तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहित खैरे यांनी देखील आपापले सुभे उभे केले असले तरी एकविचाराचा अभाव आणि तालुका पातळीवरील नेता म्हणून त्यांच्या नेतृत्वाला येणाऱ्या मर्यादा यांची तुलना करता या निवडणूकीत सध्यातरी राष्ट्रवादीचे पारडे भारी भरताना दिसत आहे.

विधानसभेतील मोठ्या पराभवानंतर गलितगात्र झालेल्या भाजपमध्ये नुकत्याच झालेल्या सोसायटी निवडणुकांच्या निकालांतून काहीशी धुगधूगी निर्माण झाली असली; तरी या धुगधूगीतून तालुका पातळीवरील या निवडणूकीत फारसा प्रकाश पडेल, असे नाही. त्यामुळे बलवान राष्ट्रवादीसमोर त्याच ताकदीने उभे राहताना भाजपचा कस लागणार आहे, हे मात्र निश्चीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT