Ashwini Jagtap Sarkarnama
पुणे

Ashwini Jagtap : हिंजवडी आयटी पार्कचा धोका टळला, पुनावळेतील कचरा डेपोचा डाव आमदार अश्विनी जगतापांनी हाणून पाडला

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडचा कचरा डेपो शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात मोशी येथे शंभर एकर जागेत आहे.मात्र,तो फुल्ल झाल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात पुनावळेत 65 एकर जागेत करण्याचे महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, त्याला स्थानिक भाजप आमदार चिंचवडच्या अश्विनी जगताप यांनी कडाडून विरोध विधानसभेत केला.त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कला धोका निर्माण करणारा हा कचरा डेपो पुनावळेत होण्याची शक्यता तूर्तास कमी झाली आहे.

चिंचवडच्या आमदार अश्विनी जगतापच (Ashwini Jagtap) नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही (शरद पवार) पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोला अगोदरच कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी त्यांनी कालपर्यंत (ता.११) महापालिकेसमोर पाच दिवस साखळी उपोषण केले.आमदार जगतापांनी याप्रश्नी लक्षवेधी दिली असून तारांकित प्रश्नही विचारला आहे.

मात्र, तो पटलावर येण्यापूर्वीच पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेत चिंचडकरांना त्रासदायक ठरणारा कचरा डेपोचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडण्याची संधी साधली. या जागेत ऑक्सिजन पार्क करण्याची मागणी करीत तेथे कचरा डेपो करणाऱ्यांचा डाव त्यांनी हाणून पाडला.

त्यामुळे स्थानिक रहिवाशीच नाही,तर पाच लाख आयटीएन्स काम करीत असलेल्या आणि अब्जावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या लगतच्या हिंजवडी आयटी पार्कचा धोकाही तूर्तास टळला आहे. कारण हा कचरा डेपो पुनावळेत करून शरद पवार यांनी आणलेला तेथील आयटी पार्क भोसरीत नेण्याचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अगोदरच केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुनावळे (Punawale) येथे कचरा डेपोसाठी पिंपरी महापालिकेने वनविभागाकडे मागितलेली ही ६५ एकर जागा सरकारने देऊ नये,अशी मागणी आमदार जगताप यांनी यावेळी केली.कारण या भागात परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेले असून एक लाखाहून अधिक नागरिक सध्या तेथे राहत आहेत. तेथील नैसर्गिक वातावरण, शेजारी असलेले हिंजवडी आयटी पार्क या डेपोमुळे खराब होण्याची शक्यता आहे.त्यातून सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार असून तेथील हजारो झाडांची कत्तल करावी लागणार आहे,याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे तेथे जैववैविधतेचा उत्तम नमुना असलेले ऑक्सिजन पार्क करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हुतात्मा चापेकर बंधूंच्या चिंचवडगावातील चापेकर वाड्यात राष्ट्रीय संग्रहालयासाठी निधी देण्याची दुसरी मागणी आमदार जगतापांनी यावेळी केली.गत अधिवेशनातही ती केली होती.अंदाजे ४२ कोटी रुपयांचे हे काम असून त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.त्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते करण्याचा मानस आहे.मात्र,दुसऱ्या टप्याचे काम निधीअभावी अडले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT