Ravindra Dhangekar On Narendra Modi  Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar On Modi : '' ...हा तर पंतप्रधानांचा केविलवाणा प्रयत्न!''; आमदार धंगेकरांचा पुन्हा मोदींवर निशाणा

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून लढणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. त्यावर त्यांच्याविरुद्ध कसबा पेठचे कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी लगेच दंड थोपटले होते. मोदींविरुद्ध २०२४ ला पुण्यातून विजयी होऊ,असा दावा सुद्धा त्यांनी केला होता. आता त्याच धंगेकरांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केले. घरगुती गॅस दराच्या कपातीवर त्यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.

भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त पिंपरीत काढण्यात आलेल्या यात्रेत कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. धंगेकर म्हणाले, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रलोभने आणि खोटी आश्वासने देऊन नागरिकांना आता मोदी फसवू शकत नाही, असे ते म्हणाले. आगामी सर्व निवडणुकांमध्ये मतदारराजा त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही,असा दावा त्यांनी केला.

केंद्र आणि राज्यातही सत्ता परिवर्तन होणार...

सर्वसामान्यांचा या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्यातही सत्ता परिवर्तन होईल. तसेच खोट्या, फसव्या, सर्वसामान्यांना छळणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, महिलांचे घरचे बजेट ढासळवणाऱ्या, सर्वत्र महागाईचे सावट निर्माण केलेल्या नरेंद्र मोदी(Narendra Modi) सरकारचे कायमस्वरूपी अस्तित्व संपुष्टात येऊन जनता सत्ता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी यावेळी केला.

धंगेकर म्हणाले, मोदी सरकारने रक्षाबंधनाच्या आदल्यादिवशी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात दोनशे रुपयांची केलेली कपात ही २०२४ ची लोकसभा आणि राजस्थान,मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा,मिझोराम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केली आहे. केवळ सत्तेसाठी जनतेला प्रलोभन दाखवण्याचा मोदींचा हा केविलवाणा प्रयत्न आहे,अशी टीका धंगेकरांनी मोदींवर केली आहे.

मोदींविरुद्ध आपण उभे राहून विजयी होऊ...

भाजपचे दिवगंत खासदार गिरीश बापट(Girish Bapat) यांच्या जागेवर मोदी आगामी लोकसभेला लढणार अशी चर्चा नुकतीच झाली होती. त्यावर पुण्यात धंगेकरांनी मोदींविरुद्ध आपण उभे राहून विजयी होऊ, असा दावा ठोकला होता. तर,त्यांनी आज पुन्हा मोदींवर तोफ डागली. एकूणच मोदींवर तुटून पडण्याची संधी धंगेकर सोडत नाही,हे यातून दिसून आले आहे.आता त्यांनी नुकतीच मोदी सरकारने केलेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दर कपातीवरुन त्यांच्यावर तोफ डागली आहे.

या यात्रेत सेवादल अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, माजी नगरसेवक बाबू नायर, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भरत वाल्हेकर, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, डॉक्टर सेल अध्यक्षा मनीषा गरुड, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, सचिन कदम आदी सहभागी झाले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT