Rohit Pawar Sarkarnama
पुणे

MLA Rohit Pawar: हिंदू मतांना आकर्षित करण्यासाठी 'हा' निर्णय; रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

Sudesh Mitkar

Pune News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता देशी गायीला 'राज्यमाता-गोमाता' घोषित करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने यावर राजकारण सुरू झाले आहे. आगामी निवडणुकांमध्ये राजकीय फायदा घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं टीका विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील या निर्णयावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

याबाबत सरकारने अधिसूचना काढली आहे. यात भारतीय संस्कृतीत देशी गायीचे महत्त्व लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत देशी गायीचे महत्त्व, त्याची उपयुक्तता. मानवी आहारात देशी गाईचे दूध, आयुर्वेद औषध, पंचगव्य उपचार पद्धती आणि सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गायीचे शेण व गोमूत्राचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन देशी गायीला ‘राज्यमाता गोमाता’ म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

असे असले तरी हिंदू मतांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला असल्याचे टीका विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

रोहित पवार म्हणाले, "दुष्काळात चारा-पाणी नसताना चारा छावण्या मार्चमध्ये सुरु करण्याऐवजी पावसाळा सुरु झाल्यानंतर जूनमध्ये सुरु केल्या तेव्हा गोमाता आठवली नाही, दुधाला चांगला दर देण्यासाठी तसेच दुध अनुदानासाठी जाचक अटी टाकताना गोमाता आठवली नाही, सद्यस्थितीला पश्चिम महाराष्ट्रात लम्पी आजाराने डोके वर काढले असताना गोमाता आठवत नाही.

आज निवडणूक येताच शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत भावना जागृत होऊन गोमातेला राज्यमाता घोषित करण्याचा साक्षात्कार होणाऱ्या या सरकारच्या भावना गोमाता अडचणीत असताना कुठे जातात ? खऱ्या भावना असत्या तर पशुधन अडचणीत असताना मदत केली असती, असो पुतना-मावशीचे हे खोटारडे प्रेम दाखवणाऱ्या या खोटारड्या सरकारला महाराष्ट्र चांगलंच ओळखून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT