Sunil Shelke Birthday Flex Sarkarnama
पुणे

Cabinet Expansion : सुनील शेळकेंनी टायमिंग साधलं; मावळासह ‘एक्स्प्रेस वे’वर झळकलेल्या बॅनर्सची चर्चा!

उत्तम कुटे

Pimpri News : अजित पवार हे भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सामील होताच लगेच भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर झळकले. असेच फ्लेक्स इतर आमदार, खासदारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे उत्साही कार्यकर्ते लावून त्यावर त्यांचा उल्लेख भावी मंत्री म्हणून करतात. त्यामुळे या लोकप्रतिनिधींची गोची होते. त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागते. दरम्यान, अजित पवारांनंतर त्यांचे कट्टर समर्थक, मावळचे आमदार सुनील शेळके यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मावळसह पुणे-मुंबई ’एक्स्प्रेस वे’वर झळकले आहेत. (MLA Sunil Shelke's show of strength for ministerial post)

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आमदार शेळकेंचे हे बॅनर लागल्याने नेमके टायमिंग साधल्याची चर्चा आहे. शेळकेंना मंत्रिपद मिळालं, तर मावळात मंत्रिपदाची हॅट्‌ट्रिक होणार आहे. मदन बाफना, बाळा भेगडेंनंतर शेळके मंत्री होतील. मात्र, शेळकेंना राज्यमंत्रिपद मिळेल, एवढं मात्र नक्की. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (अजित पवार गट) कॅबिनेट मंत्रिपदाचा कोटा जवळपास फुल झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पहिल्याच टर्ममध्ये दमदार कामगिरी करणारे सुनील शेळके हे मंत्रिपदाचे हक्कदार असल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. मंत्रिपदासाठी कोट शिवून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शिवसेनेतील (शिंदे) आमदारांसाठी हा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यांना मंत्रिपद दर्जाचे महामंडळाचे अध्यक्षपद देऊन हा विस्तार न होण्याचीही दुसरी चर्चा आहे.

दुसरीकडे, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा रंगताच पिंपरी-चिंचवडचा हा बॅकलॉग भरून काढण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यातून यापूर्वी चर्चेत असलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. कारण अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्याने तेच पुन्हा उद्योगनगरीचे कारभारी झाले आहेत. त्यांच्या एन्ट्रीमुळे महेश लांडगेंबरोबरच माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याही ‘दादागिरी`ला लगाम लागला आहे. मात्र, आगामी निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांना रोखण्यासाठी महेश लांडगेंना मंत्री करून ताकद देण्याच्या त्यांच्या पाठिराख्यांच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली आहे.

गेल्या पंचवार्षिकमध्ये नाही, तर या वेळी तरी मंत्रिपदाचा शहराचा बॅकलॉग भरून निघेल, अशी आशा पिंपरी-चिंचवडकरांना होती आणि आहे. त्यासाठी महेश लांडगेंबरोबर (स्व.) आमदार लक्ष्मण जगताप हे दावेदार होते. पण, या दोघांच्या शर्यतीत मावळातील भेगडेंना मंत्री करण्यात आले. त्यामुळे उद्योगनगरीचे मंत्रिपद हुकले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळे ती संधी मावळला मिळाली. तेच आता उपमुख्यमंत्री असून, महेश लांडगे हे त्यांचे निकटवर्तीय असून, त्यांना क्रीडा राज्यमंत्री केले जाईल, अशी आशा त्यांच्या समर्थकांनी सोडलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT