Pune News : राज्य विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यावेळच्या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा 'घोडेबाजार' होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या मर्यादित असल्याने एका एका मताला तब्बल 10 ते 15 लाख रुपयांचा भाव फुटल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर, निवडणुकीतील पैशांचा अफाट गैरवापर आणि मतदारांची खरेदी रोखण्यासाठी आयकर विभागाने अत्यंत कडक पावले उचलली असून संपूर्ण राज्यावर आपली करडी नजर ठेवली आहे.
विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे लोकप्रतिनिधी मतदान करतात. सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीत मतदारांची संख्या अत्यंत मर्यादित असते. यामुळेच प्रत्येक मताचे मूल्य निर्णायक ठरते आणि येथूनच खऱ्या 'घोडेबाजारा'ला सुरुवात होते.
निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून विरोधी किंवा अपक्ष मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी थेट लाखोंच्या बोली लावल्या जातात. यंदा तर हा आकडा १० ते १५ लाखांच्या घरात गेल्याचे बोलले जात आहे.
केवळ पैशांचे आमिष दाखवून हा खेळ थांबत नाही, तर मत फुटू नये म्हणून मतदारांना एकत्र करून थेट परराज्यात किंवा अज्ञात ठिकाणी सहलीला पाठवून 'नॉट रिचेबल' संस्कृतीही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. मतदानाच्या दिवसापर्यंत मतदारांची ही तटबंदी सांभाळण्यासाठी कोट्यवधी रुपयांची अनधिकृत रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंचा प्रचंड वापर केला जातो. हाच घोडेबाजार मोडीत काढण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे.
या निवडणुकीतील पैशांचा गैरवापर थांबवून ती पूर्णपणे मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आयकर विभागाने कंबर कसली आहे. विभागाने विविध मतदारसंघांसाठी विशेष स्थानिक प्राधिकारी नेमले असून, त्यांच्या देखरेखीखाली 24 तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पुणे, ठाणे, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातार आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जिल्ह्यांवर या नियंत्रण कक्षाची थेट नजर असणार आहे.आदर्श आचारसंहिता लागू असेपर्यंत हा कक्ष अविरतपणे सुरू राहील.
प्रचाराच्या काळात कुठेही संशयास्पद रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तूंची वाहतूक अथवा वाटप होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयकर विभागातर्फे करण्यात आले आहे.
जर कोठेही निवडणूक प्रक्रियेला गालबोट लावणारे गैरप्रकार किंवा पैशांचे वाटप सुरू असल्याचे निदर्शनास आले, तर नागरिक खालील पत्त्यावर आणि क्रमांकावर थेट तक्रार नोंदवू शकतात
व्हॉट्सॲप क्रमांक : ९४०४५६९४७६
ई-मेल आयडी: pune.pdit.inv@incometax.gov.in
पत्ता : नियंत्रण कक्ष, खोली क्रमांक ८२६, आठवा मजला, आयकर सदन, बोधी टावर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे - ४११०३७.
विधानपरिषद निवडणुकीतील या कथित 'लक्ष्मीदर्शना'वर आणि मतदारांच्या पळवापळवीवर आयकर विभागाचा हा २४ तासांचा खडा पहारा कितपत यशस्वी ठरतो, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.