Raj Thackeray, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Pune Politics : पुण्यातील 3 मतदारसंघात तिरंगी लढत, तर 5 मतदारसंघात बिनशर्त पाठिंबा?

Mahayuti-MNS For Assembly Election : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मनसेने पुन्हा एकदा किशोर शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. गेल्या वेळी कोथरूडच्या रिंगणात उतरलेल्या शिंदेंना महाविकास आघाडीने आपला पाठिंबा दर्शवला होता.

Sudesh Mitkar

Pune News, 23 Oct : आगामी विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. भाजप पाठोपाठ मनसेने (MNS) देखील आपली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मनसेकडून पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

त्यामुळे कोथरूड, खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र इतर पाच विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार देणार की महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) सर्वप्रथम 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्या पाठोपाठ आता मनसेने दुसरी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीत कोथरूड ,खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून मनसेने आपला उमेदवार निश्चित केला आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून (Kothrud Assembly Constituency) मनसेने पुन्हा एकदा किशोर शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मागील निवडणुकीत देखील कोथरूडमधून किशोर शिंदे विरुद्ध चंद्रकांत पाटील असा दुरंगी सामना रंगला होता. गेल्या वेळी कोथरूडच्या रिंगणात उतरलेल्या शिंदेंना महाविकास आघाडीने आपला पाठिंबा दर्शवला होता.

मात्र, यंदा या मतदारसंघातून शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवार उतरवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास मनसेने या ठिकाणी दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश वांजळे यांना मैदानात उतरवलं आहे.

मनसेचे फायर ब्रँड नेते असलेले रमेश वांजळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. यानंतर तब्बल 11 वर्षानंतर त्यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दोन्हीकडेही खडकवासल्याची जागा कोणाकडे जाणार? हे अद्याप निश्चित झालेलं नाही.

तसंच उमेदवार निश्चिती करण्यासाठी बैठकांचा धडाका सुरूच आहे. असं असलं तरी पुढील दोन दिवसांत खडकवासल्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार जाहीर होईल आणि या ठिकाणी देखील तिरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातून मनसेने शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. तर महायुतीकडून (Mahayuti) चेतन तुपे यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. आघाडीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला सुटणार की शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडे जाणार यावर अद्यापही एकमत झालेलं नाही.

काही दिवसांपूर्वी पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पुण्यातील काही विधानसभा मतदारसंघात मनसेने महायुतीच्या उमेदवारांना मदत करावी आणि उमेदवार देऊ नयेत, अशी मागणी केली असल्याचं सांगण्यात येत होतं.

त्यानंतर मनसेने तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले असून मनसे इतर पाच विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार की महायुतीच्या उमेदवाराल बिनशर्त पाठिंबा देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT