MNS leaders face FIR after heated exchange with Pune Municipal Commissioner; political support surges from Maha Vikas Aghadi.  
पुणे

Mahavikas Aghadi with MNS : मनसेला महाविकास आघाडीची साथ; निवडणुकीआधी युतीची चर्चा सुरू असतानाच नवा 'पुणे पॅटर्न'

FIR Filed Against MNS Leaders After Clash in Pune : पुणे महापालिका कर्मचारी एकवटले असताना मनसेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही मित्रपक्ष मैदानात उतरले आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीआधी वेगळीच आघाडी पाहायला मिळत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महापालिकेमध्ये बुधवारी मनसे नेते किशोर शिंदे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. बैठक सुरू असताना अचानकपणे निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिंदे आणि आयुक्तांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीमध्ये किशोर शिंदे थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप आहे. तसेच आयुक्तांनी देखील तुमचं वर्तन गुंडांप्रमाणे असल्याचं किशोर शिंदेंना सुनावल्याचा दावा केला जात आहे आहे. त्यानंतर किशोर शिंदे यांनी आयुक्तांना मराठीत बोला असे सांगितल्याने या वादाला हिंदी मराठी वादाची किनार देखील लाभली.

वाद वाढल्यानंतर पुण्यातील अनेक मनसे नेते महापालिकेत दाखल झाले आणि त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. महापालिका आयुक्तांवर कारवाई करावी तसेच आयुक्तांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी मनसेच्या नेत्यांनी केली. तब्बल दोन ते तीन तास हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या आवारातून ताब्यात घेतलं आणि आता या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे महापालिका आयुक्तांबाबत झालेल्या वर्तनाच्या निषेधार्थ महापालिकेतील कर्मचारी एकवटले असून या कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून महापालिकेच्या आवारात काम बंद आंदोलन करण्यात आलं. यावेळी घडलेली घटना अतिशय निषेधार्ह असल्याचं नमूद करण्यात आलं. तसंच महापालिकेचे कर्मचारी या प्रकारची राजकीय दादागिरी सहन करणार नाहीत, असं देखील यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

महापालिका कर्मचारी एकवटले असताना दुसरीकडे मनसेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही मित्रपक्ष मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळालं. मनसे नेते किशोर शिंदे यांच्यासोबत ज्या पद्धतीने आयुक्त वागले ते अतिशय चुकीचे असून त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा देखील अन्यायकारक असल्याचं मत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

एवढेच नाही तर आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी महापालिकेसमोर या निषेधार्थ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे मनसेसाठी किंबहुना मनसेसोबत आंदोलन करण्याची महाविकास आघाडीची ही पहिलीच वेळ आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती होऊ शकते, अशा चर्चा सुरू आहेत. मात्र अशा प्रकारची युती झाल्यास महाविकास आघाडीचे काय होणार महाविकास आघाडी मनसेला आपल्या सोबत घेणार का? तसंच मनसेची महाविकास आघाडी सोबत येण्याची काय भूमिका असणार यावर मोठ्या प्रमाणात चर्चांचे खल सुरू आहेत. अशातच मनसेविरुद्ध आयुक्त वादाच्या पार्श्वभूमीवर मनसेला महाविकास आघाडीची साथ मिळाल्याने आगामी महापालिका निवडणुकीमध्ये देखील ही साथ कायम राहणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT