Raj Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Mns Raj Thackeray News : मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांनी बोलाविली बैठक

Chaitanya Machale

Pune Political News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ठाकरे यांनी जाहीर मेळाव्यात घेतलेल्या भूमिकेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. ठाकरे यांनी हा निर्णय घेण्यामागचे कारण काय, यावर चर्चा करून त्यामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक बैठक बोलाविली आहे.

मुंबई येथे उद्या (शनिवारी) १३ एप्रिलला ही पक्षाची बैठक होणार असून, यासाठी मनसेचे शहरातील नेते आणि सरचिटणीस यांना बोलाविण्यात आले आहे. त्यानुसार पुणे शहरातील मनसेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मनसेने भाजप, महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पाठिंबा देताना ठाकरे यांनी कोणतीही अट न घालता बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मुंबई (Mumbai) येथील शिवतीर्थावर झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुजरातमधील विकासकामे पाहून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी भूमिका आपण सर्वात पहिल्यांदा मांडली होती. मोदी यांनी जे चांगले निर्णय घेतले त्याचे कौतुक केले, तर न पटणाऱ्या निर्णायाबाबतदेखील कडक भूमिका घेत त्यांना खडे बोल सुनावल्याचे ठाकरे यांनी या मेळाव्यात सांगितले होते. राज्यातील बदललेली राजकीय स्थिती यावरदेखील ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत टीका केली होती. देशाला खंबीर नेतृत्वाची गरज असून, त्यासाठी केवळ नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देत असल्याची भूमिका ठाकरे यांनी जाहीर केली.

ठाकरे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मनसे (Mns) कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पक्षाच्या सरचिटणीस, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यानंतर काही तासांतच नाराजी व्यक्त करत थेट आपल्या पदांचा तसेच मनसेच्या सदस्य पदाचे राजीनामे दिले आहेत. ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुतीला पाठिंबा दिल्याने आता महायुतीच्या प्रचारात कशा पद्धतीने सहभागी व्हायचे, यावर सविस्तर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी बैठक बोलाविली आहे. यासाठी सरचिटणीस, नेते यांनाच आमंत्रित करण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केला असला तरी गुरुवारी मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या मेळाव्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी दांडी मारली होती. पुणे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार पत्रकावर अद्यापही राज ठाकरे यांचा फोटो टाकण्यात आलेला नाही, तर दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावर मात्र राज ठाकरे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व विषयांवर या बैठकीत चर्चा होऊन त्यावर ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT