MNS News Sarkarnama
पुणे

MNS News : लोकसभेसाठी मनसेचा 'मास्टर प्लॅन' ठरला; काय असणार रणनीती ?

मंगेश कोळपकर

Pune News : लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये होणार असून त्यासाठी आचारसंहिता जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी महिन्यात लागणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेची तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांना मनसे स्वबळावर सामोरे जाणार असल्याचे संकेत खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान ९०० कार्यकर्त्यांचा संच करण्यासाठीचा आराखडा तयार केला आहे.यानुसार अंमलबजावणी करण्याचा आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी आढावा बैठकीत बुधवारी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये मनसे नेते, सरचिटणीसांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह आढावा बैठका सुरु आहेत.राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची ‘मनसे’ने (MNS) तयार सुरू केली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील 22 मतदारसंघांसाठीची आढावा बैठक मुंबईत झाली.

त्यात कार्यकर्त्यांच्या संघटन आराखड्याचे स्वरूप निश्चित करण्यात आले. या प्रसंगी मनसेचे नेते बाबू वागस्कर तसेच रणजित शिरोळे, बाळा शेडगे, किशोर शिंदे, गणेश सातपुते, अजय शिंदे, जयराज लांडगे आदी उपस्थित होते.

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.तेथील प्रत्येक मतदारसंघात १५० कार्यकर्त्यांची टिम तयार करण्यात येईल.त्यांच्यामार्फत पक्षाची भूमिका तळागाळातील कार्यकर्ते आणि नागरिकांपर्यंत पोचविण्यात येईल.स्थानिक पदाधिकाऱ्यांची त्यावर देखरेख असेल. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघांसाठी किमान ९०० कार्यकर्त्यांचा संच निर्माण होईल.त्याचा उपयोग पक्षाला लोकसभा तसेच विधानसभा, आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी होईल,अशी माहिती पक्षाचे नेते वागस्कर यांनी दिली.

बारामतीची जबाबदारी वसंत मोरे...

पुणे शहर लोकसभा मतदासंघाची जबाबदारी अमित ठाकरे(Amit Thackeray), बाळा शेडगे आणि अजय शिंदे यांच्याकडे आहे. तर शिरूरची जबाबदारी बाबू वागस्कर, मावळची जबाबदारी रणजित शिरोळे आणि बारामतीची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे आहे. या चारही मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा संबंधितांनी ठाकरे यांच्यासमोर सादर केला. त्यात संभाव्य राजकीय परिस्थिती, मतदारसंघातील मुद्दे, अन्य पक्षांची भूमिका आदींबाबतही यावेळी चर्चा झाली.

पुण्यातील चारही मतदारसंघ लढवा

पुणे शहर, बारामती, मावळ आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवावी, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्याकडे केली. तसेच चारही मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा त्यांनी सादर केला. त्यावर ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शविली. सुरवातीला संघटन तयार करण्यावर भर द्या, अशी सूचना त्यांनी केली.

याबाबत वागस्कर म्हणाले,आढावा बैठकीत जिल्ह्यातील चारही जागा लढविण्याची कार्यकर्त्यांची तयारी असल्याचे मत मांडण्यात आले.तेथील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली. आता पुढच्या टप्प्यात अन्य प्रक्रिया सुरू होतील.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT