MPSC student Protest. Sarkarnama
पुणे

MPSC Protest Pune : MPSC आंदोलन पेटले अन् पोलीस ॲक्शन मोडमध्ये : 29 क्लासेससह 51 विद्यार्थ्यांना नोटिसा; गुन्हे दाखल होणार?

Pune MPSC agitation : विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी आंदोलन करण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्यास आयोजकांसह संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 06 Oct : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता पोलिसांच्या कारवाईची किनार लागली आहे. शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेली आंदोलने बेकायदेशीर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, आंदोलनाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केल्याच्या कारणावरून २९ क्लास व अभ्यासिका चालकांसह ५१ विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनावर पोलिसांचा रडार अधिकच तीव्र झाला आहे.

एमपीएससीच्या विविध निर्णयांविरोधात तसेच आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. एस. एम. जोशी पूल, टिळक चौक आणि शास्त्री रस्ता अशा तीन ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले असून, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडूनही आंदोलनस्थळी भेटी दिल्या जात आहेत.

मात्र, आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्याने आयोजकांना आंदोलन करू नये, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या. या सूचनांकडे दुर्लक्ष करून आंदोलन सुरूच राहिल्याने आता संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

८० जणांना नोटिसा; गुन्हे दाखल करण्याची तयारी

आंदोलनाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या क्लास व अभ्यासिका चालकांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. २९ क्लास व अभ्यासिका चालक तसेच ५१ विद्यार्थ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आंदोलनस्थळी पोलिसांनी केलेले चित्रीकरण, आयोजकांना यापूर्वी देण्यात आलेल्या सूचना आणि त्यानंतरही सुरू राहिलेले आंदोलन याची माहिती पोलिसांकडून संकलित केली जात आहे.

या सर्व बाबींच्या आधारे संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीही आंदोलनाला परवानगी नसल्याचे स्पष्ट करत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.

आंदोलनाचा अधिकार, पण सार्वजनिक ठिकाणी परवानगी आवश्यक

विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी आंदोलन करण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्यास आयोजकांसह संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असल्याने पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. आंदोलनाला राजकीय पाठिंबा वाढत असतानाच पोलिसांकडून कारवाईचा इशारा देण्यात आल्याने एमपीएससी आंदोलन आता नव्या टप्प्यावर पोहोचले आहे.

ड्रोनने चित्रीकरण; मालकाचा शोध सुरू

एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनादरम्यान संशयित ड्रोन उडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. हे ड्रोन कोणी आणि कोणत्या उद्देशाने उडविले, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. आंदोलनाचे चित्रीकरण करण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला असल्यास त्याबाबतही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ड्रोनद्वारे चित्रीकरणासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एकीकडे विद्यार्थी आंदोलनावर ठाम असून, दुसरीकडे पोलिसांनी आंदोलन बेकायदा ठरवत नोटिसा आणि संभाव्य गुन्ह्यांची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे एमपीएससी आंदोलनाचा पुढचा टप्पा आता अधिक संघर्षपूर्ण होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT