

Thane News : उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीलाच उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नुकताच शिवसेनेच्या पाच आणि भाजपच्या दोन अशा स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली होती. ज्यावर भाजपने आक्षेप घेत थेट शिवसेनेसोबतची युती तोडण्याची घोषणा केली होती. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कमलेश निकम, पप्पू कलानी आणि ओमी कलानी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर लोकसभेला शिंदेंचे काम करणार नाही असा देखील पवित्रा घेतला होता.
महापालिकेच्या सात स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी सभागृहात पार पडला. महापौर अश्विनी निकम यांनी निवड झालेल्या सदस्यांच्या नावांची घोषणा केली. सात जागांपैकी शिवसेनेच्या पाच, तर भाजपच्या दोन सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामुळे प्रभाग क्रमांक १५ मधील भाजपाचे धनंजय बोडारे आणि शिवसेनेचे निलेश बोबडे यांना स्थान मिळाले. एकीकडे या नियुक्तीमुळे प्रभाग १५ चे राजकीय वजन वाढल्याची चर्चा असतानाच आता या निवडीलाच ब्रेक लागला आहे.
महापौर अश्विनी निकम यांनी निवड केलेल्या सदस्यांवर भाजपने अक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. ज्यानंतर न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे नामनिर्देशित नगरसेवकांच्या प्रकरणात सचिव/आयुक्तांना अधिसूचना जारी करता येणार नाही. यामुळे आता या निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला तीन, तर भाजपच्या वाट्याला चार स्वीकृत नगरसेवक येणे अपेक्षित होते. मात्र, सभा संपण्याच्या अवघ्या पाच मिनिटे आधी महापौरांनी शिवसेनेचे पाच आणि भाजपचे दोन नगरसेवक घोषित केल्याने वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे, आयुक्तांनी नामनिर्देशित केलेल्या सात नावांऐवजी भाजपच्या कोट्यातील दोन वेगळी नावे वाचल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे या निर्णयाविरोधात भाजपने न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांना ‘भेटेल तिथे फटके देणार’, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उल्हासनगरमध्ये तणाव वाढला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी इशारा दिल्यानंतर महापौर निकम यांच्या घराबाहेर जमाव जमला होता. तर याची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकारीही धावले होते. ज्यानंतर येथे पोलिसांना तातडीने धाव घ्यावी लागली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.