Sarkarnama
पुणे

PMC News : पुण्याच्या रस्त्यांवर दिसणार महापौर, उपमहापौरांचा थाट; निवडून येताच महापालिकेकडून 28 अलिशान गाड्यांची खरेदी

महापौर, उपमहापौर आणि विविध समिती अध्यक्षांसाठी महापालिकेकडून 28 अधिकृत वाहनांची खरेदी करण्याचा निर्णय.

Rashmi Mane

Pune News : महापालिकेमध्ये तब्बल नऊ वर्षांनंतर नवीन सभागृह अस्तित्वात येणार आहे. दरम्यान, नव्या सभागृहातील महापौर, उपमहापौर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, प्रभाग समिती व इतर विशेष समितीच्या अध्यक्षांच्या दिमतीला आलिशान गाड्या असणार आहेत.

महापौरांसाठी ‘हायक्रॉस’, विरोधी पक्ष नेता व शहर सुधारणा समिती अध्यक्षांना ‘व्हिक्टोरिअस’ या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आलिशान गाड्या मिळणार आहेत, तर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह समिती अध्यक्षांनाही तितक्‍याच महागड्या गाड्या मिळणार आहेत. महापालिकेकडून अशा २८ गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत, त्यावर तब्बल सव्वापाच कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे. येत्या सोमवारी (ता. ९) महापौर, उपमहापौरांची निवड प्रक्रिया पूर्ण होऊन शहराला नवीन महापौर, उपमहापौर मिळणार आहे.

त्याचवेळी नवीन सभागृह अस्तित्वात येणार असून, या नव्या सभागृहाच्या स्वागतासाठी महापालिका प्रशासन चांगलेच तयारीला लागले आहे. महापालिकेत निवडून येणाऱ्या नव्या पदाधिकाऱ्यांना महापालिकेकडून वाहन व्यवस्था पुरविली जाते. त्यानुसार, आता महापालिकेच्या मोटार वाहन विभागाकडून पदाधिकाऱ्यांसाठी २८ नवीन वाहने खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केल्यानंतर वाहन खरेदीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यासाठी ५ कोटी ३० लाख रुपये इतक्‍या खर्चाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती मोटार वाहन विभागाकडून देण्यात आली.

अशी आहेत वाहने

महापौर

शहराचे प्रथम नागरिक असणाऱ्या महापौरांसाठी वाहनांच्या ‘एसयूव्ही’ प्रकारातील वाहन खरेदी केले जाणार आहे. ‘इनोव्हा हायक्रॉस’ या आलिशान वाहनाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेकडून २५ लाख ४१ हजार १५७ रुपये इतके रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे नव्या महापौरांच्या दिमतीला अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आलिशान वाहन उपलब्ध असणार आहे.

विरोधी पक्ष नेता, शहर सुधारणा समिती अध्यक्ष

महापालिकेमध्ये महापौर यांच्याइतकेच विरोधी पक्षनेत्यालाही मान-सन्मान असतो. त्याबरोबरच शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपदही तितकेच महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने महापालिकेच्या मोटार वाहन विभागाकडून विरोधी पक्षनेता व शहर सुधार समिती अध्यक्षासाठी मध्यम आकारातील ‘एसयूव्ही’ प्रकारामधील ‘मारुती व्हिक्टोरिअस’ ही कार खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी १५ लाख ६५ हजार १५७ रुपये खर्च केले जाणार आहेत.

उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सभागृह नेता

महापौरांनंतर उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेता यांनाही चांगले वाहन उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्टायलिश सेदान प्रकारातील ‘ह्युंदाई व्हर्ना’ कार खरेदी केली जाणार आहे. या कारची किंमत १४ लाख रुपये इतकी आहे. तिन्ही पदाधिकाऱ्यांसाठी संबंधित वाहन खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

प्रभाग समिती व इतर विशेष समित्या

शहरामध्ये १५ प्रभाग समित्या आहेत. याबरोबरच इतर विशेष समित्याही अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागाच्या अध्यक्षांसह इतर विशेष समित्यांच्या अध्यक्षांनाही वाहने पुरविली जातात. त्यानुसार प्रभाग समिती अध्यक्षांसह इतर विशेष समित्यांच्या अध्यक्षांना ग्रॅंड विटारा वाहन मिळणार आहे. एका वाहनाची किंमत १४ लाख इतकी आहे.

विकासकामांच्या निधीला कात्री लागणार का? महापालिकेत नऊ वर्षांपासून प्रशासकराज आहे. त्यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांची वाहने आता जुनी झाली आहेत. ती वाहने आता वापरता येणार नसल्याने महापालिकेकडून नवीन वाहने खरेदी केली जात आहेत. त्यासाठी २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात तरतूद दिसत नाही. त्यामुळे नवीन वाहनांसाठीचा ५ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च महापालिका विकासकामांच्या निधीला काही प्रमाणात कात्री लावून भागविणार का? असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT