Pune News : पुणे महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर करण्यात आली. ही आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 'कही ख़ुशी, कही गम' अशी परिस्थिती पाहवयास मिळत आहे. या सोडतीनंतर आता कोथरूड भागातील निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पक्षाकडून आता बैठकांचे सत्र सुरू झाले असून कोणासोबत जाऊन महायुती किंवा आघाडी करायचे याबाबतचा अंतिम निर्णय होऊ लागला आहे. त्यातच आता कोथरूड भागातील पाच प्रभागात आरक्षण काय पडले? यापेक्षा उमेदवारी कोणाला मिळणार यासाठी इच्छुकांमध्ये लढाई असणार आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघात जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळणार आहे. या ठिकाणी पडलेले आरक्षण पाहता व इच्छुक असलेले उमेदवार वाढल्याने राजकीय गणिते येत्या काळात बदलणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस पहावयास मिळणार आहे. विशेषतः पुण्यात महायुती व महाविकास आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रत्येकाला त्याची उत्सुकता लागली आहे.
कोथरूड परिसरात महापालिकेचे पाच प्रभाग आहेत. या भागातील पाच प्रभागांमध्ये पडलेल्या आरक्षणाचा फार मोठा परिणाम येथील माजी नगरसेवकांवर होणार नाही. प्रभाग क्रमांक 10 मध्ये बावधन- भुसारी कॉलनीचा परिसर येतो तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये रामबाग कॉलनी-शिवतिर्थनगरचा परिसर येतो. प्रभाग क्रमांक 29 मध्ये डेक्कन जिमखाना, हॅपी कॉलनी हा परिसर येतो. प्रभाग क्रमांक 30 मध्ये कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी, प्रभाग क्रमांक 31 मध्ये मयूर कॉलनीच्या प्रभागात ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिलांसाठीचे दोन व सर्वसाधारण एक असे आरक्षण पडले आहेत. त्यामुळे येथे आरक्षण काय पडले यापेक्षा उमेदवारी कोणाला मिळणार यासाठी इच्छुकांमध्ये लढाई असणार आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात सर्वाधिक स्पर्धा
भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये यंदा सर्वाधिक इच्छुक रिंगणात आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकांमध्ये उमेदवारीसाठी जोरदार चुरस असणार आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये समर्थकांच्या उमेदवारीवरून चर्चाही झाल्याचे समजते. याशिवाय, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडूनही त्यांच्या समर्थकांसाठी उमेदवारीची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी सर्वाधिक स्पर्धा पाहवयास मिळणार आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
उत्सुकता शिगेला
कोथरूडमधील उमेदवारीसाठी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची मर्जी राखणे इच्छुकांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. गेल्या काही दिवसांत कोथरूडमधील वाढलेल्या वाऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारीच्या शर्यतीत टिकण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, येत्या काळात कोथरूडमधील राजकीय समीकरणे आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरक्षणाची घोषणा झाल्याने आता सर्वांचे लक्ष उमेदवार निवडीकडे लागला आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मुरलीधर मोहोळांचा प्रभाग असलेल्या कोथरूड - मयूर कॉलनी प्रभागात १ मागास प्रवर्गासाठी, २ सर्वसाधारण महिला व खुल्या गटासाठी एक जागा सुटली आहे. इथून नीलेश कोंढाळकर, दुष्यंत मोहोळ, श्याम देशपांडे, पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, यांच्यासह हेमंत संभूस आदी इच्छुक असल्याने ओबीसी आणि सर्वसाधारण जागेसाठी रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.