Pune loksabha election News update : पुणे टिंबर मार्केटमध्ये गोडाऊनला नुकतीच भीषण आग लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या घटनेची शनिवारी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. (Ncp leader Ajit Pawar speaks on Pune loksabha election)
पुणे टिंबर मार्केटमधील गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचा आढावा अजित पवारांनी घेतला. आग विझवण्यासाठी योगदान दिलेल्या अग्निशमन,पोलीस, स्थानिक प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे त्यांनी कौतुक केले.
या आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या आगीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत आतल्या गोटातील माहिती पत्रकारांना सांगितली.
भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. याबाबत निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. निवडणूक होणार की नाही, याबाबतच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.
अजित पवार म्हणाले, "मला वाटत होतं की लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिलं आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागणार नाही. पण या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे, अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे,"
जागा वाटपावरून पक्षांमध्ये कुरबुर..
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत अजित पवार म्हणाले, "लोकसभा 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी कामाला लागले आहेत. जागा वाटपावरून पक्षांमध्ये कुरबुर असल्याचेही समोर आले आहे,"
नेत्यांचे दर्जाहीन वक्तव्य
राज्याच्या राजकारणात अलीकडे प्रतिक्रिया देताना नेत्यांची जीभ घसरत आहे. या विषयाकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले, "सध्या काही जण हलक्या दर्जाची विधानं करतात. दर्जाहीन वक्तव्य करतात. याचा खरंतर आपल्या सगळ्यांनीच विचार करायला हवा. नेतेमंडळींच्या वक्तव्याचा दर्जा खालावला आहे,"
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.