Khed Market Committee
Khed Market Committee Sarkarnama
पुणे

Khed Market Committee : खेड बाजार समितीतील उमेदवारांच्या कोटीच्या कोटी उड्डाणांमुळे मतदार झाले 'लखपती'

सरकारनामा ब्यूरो

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : खेड बाजार समितीतील सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या भीमांशकर शेतकरी सहकारी पॅनेलने यावेळीही कायम राखली. १८ पैकी १० जागा त्यांनी जिंकल्या. आमदार दिलीप मोहितेंचे झाडून सारे विरोधक पुन्हा एकदा यावेळी त्यांच्याविरुद्ध एकवटले होते. अगदी कट्टर राजकीय वैरी असलेली भाजप,कॉंग्रेस आणि ठाकरे शिवसेनाही त्यासाठी एक झाली होती. त्यांनी मिळून सहकारी परिवर्तन स्थापन केले होते. दरम्यान, निकालानंतर निवडणूक प्रचारातील एकेक सुरस कथा आता बाहेर समोर येत आहेत.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती(Khed Market Committee)च्या निवडणुकीत शुक्रवारी (दि..२८) झालेल्या अनेक उमेदवारांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. त्यातील एकाने,तर आपल्याला मत द्या म्हणून नाही,तर प्रतिस्पर्धी पॅनेलच्या प्रमुखाला ते देऊ नका म्हणून प्रत्येक मतदाराला वीस हजार रुपये वाटल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीला होणारा खर्च या बाजार समितीला काही उमेदवारांचा झाला. एक-दोन कोटी रुपये त्यांनी खर्ची केले. एकूण ३६ उमेदवार रिंगणात होते. त्यातील काहींचा अपवाद वगळता इतरांचे मिळून पन्नास ते साठ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे.दोन्ही पॅनेलनी कोटीच्या कोटी उड्डाणे भरली.

प्रथम त्यांनी पॅनेल म्हणून प्रत्येक मतदाराला पाच रुपये वाटल्याचे आता कळले आहे. नंतर वैयक्तिक मतांसाठी ११ हजार रुपयांपासून वीस हजारांपर्यंत भाव फुटला. म्हणजे दोन्ही पॅनेलमधील अनेक उमेदवारांनी एकेका मतासाठी काही हजार रुपये एकेका मतदाराला दिले. गुंठामंत्री पैसेवाले उमेदवार त्यात आघाडीवर होते.त्यातून सोसाय़टी मतदारसंघातील मतदार मात्र लखपती झाला.

फक्त आमदार दिलीप मोहितें(Dilip Mohite)ना विरोध म्हणून परिवर्तन पॅनेल स्थापन झाले होते. त्यांचे टार्गेट आ. मोहिते होते. म्हणूनच या पॅनेलचा एक आधारस्तंभ असलेल्या उमेदवाराने स्वत:ला मते मिळण्यासाठी नाही,तर मोहितेंना देऊ नये याकरिताही प्रत्येक मतदाराला वीस हजार रुपये दिल्याची चर्चा आहे. अशाप्रकारे त्याने चारशे मतदारांना पैसे वाटल्याचे समजते. मात्र,त्याचा व त्याच्या पॅनेलचाही नेम चुकला. मोहितेच नाही,तर त्यांचे पॅनेलही निवडून आले. मात्र, लाखो रुपयांची उधळण करणारा हा उमेदवार पडला.

बाजार समितीतून विधानसभेचा लक्ष्यवेध

विधानसभा २०२४ ला दिलीप मोहिते हेच पुन्हा उमेदवार असतील म्हणून त्यांचा बाजार समितीला पराभव करून खच्चीकरण करण्याचा त्यांचा साऱ्या विरोधकांचा डाव होता. मात्र, तो त्यांच्यावरच उलटला. मोहितेंच्या प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनेलमधीलही तिघे आगामी विधानसभेला इच्छूक आहेत. त्यांचाही पराभव झाला. तो ठरवून केल्याची चर्चा आता सुरु आहे. २०२४ ला आपल्याला प्रतिस्पर्धी राहू नये म्हणून भाजपच्याच एका विधानसभा इच्छूकाने म्हणजे त्यांच्या पॅनेलच्या दुसऱ्या एका प्रमुखाने तो केल्याची कुजबूज ऐकू आली.

मावळातही प्रतिष्ठेसाठी लाखोंचा खर्च

फक्त नाव आणि प्रतिष्ठेसाठी बाजार समिती निवडणुकीत लाखो रुपये खर्च करण्याचा प्रकार मावळ तालुक्यातही झाला. तेथे,तर बाजार समिती नावालाच आहे.समितीचे मार्केट यार्ड तथा बाजारच नाही. म्हणजे एका पै ची ही उलाढाल नाही.तरीही तेथे निवडणूक झाली.लाखो रुपये प्रचारावर खर्च केले गेले. सरपंचपदाच्या निवडणुकीतही अशीच मोठी उलाढाल झाल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीत पाहावयास मिळाले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT