Daund NCP Protest Rally
Daund NCP Protest Rally Sarkarnamna
पुणे

Silver Oak Attack : पदासाठी पुढे पुढे करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी निषेध सभेकडे फिरकलेही नाहीत!

प्रफुल्ल भंडारी

दौंड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवास स्थानावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या सभेसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड (Daund) तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) बहुतांश पदाधिकारी फिरकलेच नाहीत. सत्तास्थानांवर बसलेले आणि पदे भूषविणाऱ्यांनी निषेध आंदोलनाकडे पाठ फिरविली. (NCP office bearers turned their backs on the protest rally in Daund)

 ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवास स्थानी ८ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी दौंड पोलिस ठाण्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. पण, सभेला पक्षाचे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. दौंड तालुक्यात राष्ट्रवादीचे स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांवर वर्चस्व आहे. दौंड बाजार समितीच्या १९ जागांवर पक्षाचे निर्विवाद वर्चस्व असून त्यापैकी एकही जण फिरकला नाही. सध्या प्रशासक राजवट असलेल्या दौंड पंचायत समितीच्या १२ पैकी ११ जागा, दौंड नगरपालिकेत २४ पैकी १२ निवडून आलेले व २ स्वीकृत नगरसेवक, जिल्हा परिषदेच्या ६ पैकी ५ जागांवर निर्विवाद वर्चस्व होते. परंतु त्यामधील बहुतांश पदाधिकारी व सदस्य फिरकले नाहीत.

पक्षाच्या माध्यमातून मागील दोन दशकात दौंड तालुक्यातून पुणे जिल्हा परिषदेचे सभापतिपद, पंचायत समिती आणि बाजार समितीचे सभापती व उपसभापतिपद, दौंड नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपद, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य, जिल्हा दूध संघाचे पदाधिकारी, पक्षाकडून शिफारस करून नियुक्त करण्यात झालेले विविध शासकीय समित्यांचे पदाधिकारी आणि पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी आंदोलनाकडे फिरकलेसुध्दा नाहीत. वरिष्ठांचे नियंत्रण व समन्वयाचा अभाव आणि गटबाजी फोफावल्याने सध्या पक्षातील नेत्यांची अवस्था चहापेक्षा किटली गरम अशी झाली आहे.

दौंड तालुक्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचा दौरा किंवा कार्यक्रम असला की पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर उभे राहण्यासाठी धडपडतात किंवा नेत्यांना दिसावे, याकरिता समोरच्या रांगेत बसण्यासाठी वेळेअगोदर पोचतात. परंतु पक्षाचे अध्यक्ष यांच्या निवास स्थानावरच हल्ला झाल्यानंतर बोलविण्यात आलेल्या निषेध सभेस उपस्थित राहण्याची तसदीदेखील त्यांनी घेतली नाही.

निषेध सभेनंतर हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारास अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी असलेले निवेदन दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT