Mai dhore-sharad pawar
Mai dhore-sharad pawar sarkarnama
पुणे

शरद पवारांवर टीका करण्याची महापौरांची कुवत आहे का?

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी सोमवारी (ता. १७ जानेवारी) पाहणी केली. त्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप (bjp) व राज्यातील त्यांच्या नेत्यांनी टीका सुरु केली आहे. पिंपरीच्या महापौर माई ऊर्फ ऊषा ढोरे यांनी या घटनेचा निषेध करताना त्याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. तसेच कुठलेही वैधानिक पद नसलेल्या पवारांसाठी हा दौरा आयोजित केल्याबद्दल त्यांनी मेट्रोवरही आगपाखड केली होती. (NCP responds to Pimpri Chinchwad mayor criticizing Sharad Pawar)

आपल्या सर्वोच्च नेत्यावर टीका केल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आता खवळले आहेत. त्यांनी पवारांना लक्ष्य केलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ढोरे यांच्यावर मंगळवारी (ता. १८ जानेवारी) हल्लाबोल केला. पवारसाहेबांची वैज्ञानिकता तपासण्याची महापौरांची कुवत आहे का? अशी विचारणा पालिकेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांनी केली. आपली सत्ता जाणार आहे, याची कल्पना आल्याने महापौरांचा तीळपापड झाला. महापौरपदाला हे कृत्य शोभा देणारे नाही; म्हणून त्यांच्या बुद्धीची किव कराविशी वाटते, असा घरचा आहेर भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी दिला.

पवारांच्या दौऱ्याने भाजपचा पोटशूळ उठलाय, असा हल्लाबोल काटे यांनी केला. पिंपरी चिंचवडच्या जडणघडणीत शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांनी केवळ पिंपरी-चिंचवड मेट्रोची ट्रायल रन घेतली, तर पाटील व ढोरे यांचा पोटसूळ का उठला, अशी विचारणा त्यांनी केली. ढोरेंनी पवारसाहेबांच्या वैज्ञानिक पदाची तपासणी करण्याचे भाष्य केले. खरं तर ज्या पक्षातून (राष्ट्रवादी) त्यांनी मानाची पदे भोगली. त्याच पक्षाच्या अध्यक्षावर आरोप करण्याची महापौर यांची कुवत आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. भाजप सत्तेत असताना केवळ केबिनमध्ये बसून कामाची पाहणी व उद्घाटने करत होती. मात्र, राष्ट्रवादीचे नेते उद्‌घाटने व कामाची पाहणी फिल्डवर जाऊन करतात. कोणत्याही कामाचे श्रेय घेत नाहीत. स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा आपण जनतेसाठी काय करतो, हे राष्ट्रवादीकडून भाजपने शिकावं, असा सल्लाही त्यांनी दिला. पाटील पालकमंत्री असताना पिंपरी-चिंचवड शहरात किती विकास कामांची पाहणी व उद्घाटन केली. कोणत्या अधिकाराखाली ती केली असा सवालही काटे यांनी या वेळी उपस्थित केला.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ५ जानेवारी रोजी शहरातील विविध विकासकामांची उद्‌घाटने का करण्यात आली, असा घरचा आहेर नगरसेविका बारणे यांनी पवारांच्या दौऱ्यावर भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर दिला. चंद्रकांत पाटलांचा ही कामे, त्याची भूमिपूजने व उदघाटनाशी काय संबध, असा सवाल त्यांनी विचारला. ते या शहरातील आमदार आहेत का महाराष्ट्राचे मंत्री आहेत? महामेट्रो ही काय त्यांची मक्तेदारी आहे का? अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. पाटलांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलेल्या माझ्या प्रभागातील कामांबाबत मला फक्त एक दिवस अगोदर कल्पना देण्यात आली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत, त्याचे भान महापौरांनी ठेवावे, असा इशाराही बारणे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT