MP Amol Kolhe- Narendra Modi Sarkarnama
पुणे

MP Amol kolhe : 'दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो' खासदार कोल्हेंची अर्थसंकल्पावर टीका !

Sudesh Mitkar

Pune News : केंद्र सरकारने मंगळवारी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे 'घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो !' अशी धारदार टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. त्याचबरोबर एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा आजचा अर्थसंकल्प असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले.

एनडीए सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसल्याचे सांगत खासदार डॉ.कोल्हे म्हणाले, केवळ केंद्रातील सरकार वाचविण्यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर हे सरकार उभं आहे, त्या जेडीयू आणि टीडीपी या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करून बिहार आणि आंध्रप्रदेशला खैरात देण्याचा एनडीए सरकारचा हा प्रयत्न आहे.

अर्थसंकल्पात बिहार व आंध्रप्रदेशला निधी मिळतो, या विषयी कुणालाही वाईट वाटण्याचं कारण नाही, परंतु जो महाराष्ट्र (Maharashtra) देशाला सर्वाधिक महसूल देणारं राज्य आहे,त्या महाराष्ट्राच्या तोंडाला एनडीए सरकारने अक्षरशः पाने पुसण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका खासदार डॉ. कोल्हे यांनी केली. हा संपूर्ण प्रकार पाहिला की,मग प्रश्न निर्माण होतो, जे ट्रिपल इंजिन सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आहे, ते वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी दिल्लीच्या वाऱ्या करीत असतात, ते ट्रिपल इंजिन सरकार काय करतंय? असेही कोल्हे म्हणाले.

ट्रिपल इंजिन सरकारची केंद्र सरकारमध्ये काही भूमिका आहे असे आताच्या एनडीए (NDA) सरकारला वाटत नाही का? जर वाटत असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला भरघोस व घसघशीत दान का पडलं नाही? दिल्लीकरांच्या समोर झुकणारे आणि मोठ्या मोठ्या फुशारक्या मारणारे राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस- अजित पवार सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली. खरं तर महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणं गरजेचं आहे, असेही खासदार कोल्हे म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT