Jayant Patil Sarkarnama
पुणे

Chinchwad By Election : राज्यपालांसारखंच चिंचवडची जनता भाजपलाही घालवणार; जयंत पाटलांनी डिवचलं

Jayant Patil : यावेळी शिवजयंती का दणक्यात होणार? याचे कारणही जयंत पाटील यांनी सांगितले

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पदावरून गेल्याने आता शिवजयंती यावेळी राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये आज सांगितले. मात्र, राज्यपाल गेल्याचा आनंदोत्सव साजरा करणार नाही, असेही ते खोचकपणे म्हणाले.

महापुरुषांचा वारंवार अवमान करणाऱ्या कोश्यारींची गच्छती होताच सकाळी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा-सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, असे सूचक ट्विट केले होते. तसेच नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहूले बनणार नाहीत, अशी आशा करूयात, असा टोलाही लगावला होता.

त्यानंतर त्यांनी चिंचवडला येऊन तेथील पोटनिवडणुकीतील पक्षाचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराचा नारळ वाढविला. त्यावेळी त्यांनी कोश्यारींच्या गच्छंतीवर भाष्य केले. यावेळी पक्षाचे शहरातील सर्वच नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी या पोटनिवडणुकीनिमित्त पुन्हा एकवटल्याची दिसली. अजित पवार हे शहरात येतात, तेव्हा जसे सारे पक्षाचे नेते, पदाधिकारी एकवटतात, तसे आजही दिसले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना महाराजांचे आमच्या ह्रदयात किती मोठे आणि मानाचे स्थान आहे, हे महाराष्ट्राने दाखवून दिल्याने आता राज्यभर येणारी शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाईल, असे पाटील म्हणाले. मात्र, कोश्यारींना पदावरून हटविल्याचा आनंदोत्सव करणार नाही, असे स्पष्ट करीत काटेंच्या विजयानंतर तो केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना जसे घालवले, तसे य़ा निवडणुकीत चिंचवडकरही भाजपला घालवतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांचा अवमान केला, महाराष्ट्रविरोधी भुमिका घेतली, तेव्हा भाजप गप्प होती, त्याचा त्यांनी साधा निषेधही केला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. म्हणजे त्यांना हा महापुरुषांचा अपमान मान्य होता, असा हल्लाबोल त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT