Pargaon, 15 September : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी सध्या मतदार प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया सुरू आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या लाखणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत मतदार प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचा ठराव मंजूर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने टाकलेल्या डावपेचात लाखणगावमध्ये शिवसेना चारीमुंड्या चित झाली आहे.
लाखणगाव सहकारी सोसायटीच्या एकूण १३ संचालकांपैकी १२ संचालक हे शिवसेनेच्या विचारांचे आहेत, तर फक्त एक राष्ट्रवादी कॉंग्रेस विचाराचा आहे, त्यामुळे शिवसेनेचे सोसायटीवर वर्चस्व आहे. जिल्हा बँकेसाठी मतदार प्रतिनिधी ठरवण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष उस्मान चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या १३ संचालकांपैकी एक संचालक मृत असून, एक संचालक बैठकीला उशिरा पोहचला, त्यामुळे बैठकीला केवळ ११ सदस्य उपस्थित होते.
सोसायटीचे संचालक सतीश रोडे यांनी मतदार प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचे नाव मांडले. त्यास कैलास गाढवे यांनी अनुमोदन दिले. संचालक महेश भोजणे यांनी मतदार प्रतिनिधी म्हणून गजानन शंकर रोडे यांचे नाव सुचवले, त्याला पुष्पा गजानन रोडे यांनी अनुमोदन दिले.
जिल्हा बँकेसाठी मतदार प्रतिनिधी नियुक्तीसाठी दोन नावे आल्याने उपस्थित संचालकांचे हात वर करून मतदान घेण्यात आले. त्यामध्ये विवेक वळसे पाटील यांच्या नावाच्या ठरावाच्या बाजूने आठ संचालकांनी हात वर करून पाठिंबा दिला, तर गजानन रोडे यांच्या बाजूने फक्त तीन संचालकांनी हात वर करून पाठिंबा दिला. त्यामुळे मतदान प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे विवेक वळसे पाटील यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला.
लाखणगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते, तर सहकारी सोसायटीवर शिवसेनेचे अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीत या गावातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांना आघाडी होती, तर जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेचे अरुण गिरे यांना आघाडी होती. मात्र, विवेक वळसे पाटील यांची बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याने आंबेगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.