Neelam Gorhe Sarkarnama
पुणे

Neelam Gorhe news : आमदार धंगेंकरावर 'तो' प्रश्न अन् नीलम गोऱ्हेंचा पाराच चढला

Chaitanya Machale

Pune News : नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात झालेले कामकाज, विधेयके, सभागृहातील चर्चा याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी विधानसभेच्या उपसभापती डॅा. निलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

या पत्रकार परिषदेत उपसभापती डॅा. गोऱ्हे या चांगल्याच संतापल्याचे पाहायला मिळाले. एका प्रश्नावरून संतापलेल्या गोऱ्हे यांनी विधानपरिषद आणि विधानसभा ही दोन्ही वेगळी सभागृहे असून त्यांचे काम कसे चालते हे उपस्थितांनाच समजावून सांगितले.

कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या डॉ. गोऱ्हे विधानपरिषदेच्या आमदार आहेत. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गोऱ्हे यांना विधानपरिषदेच्या उपसभापतीपदावर संधी दिली. शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे बाहेर पडले. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यावर शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी गोऱ्हे या उद्धव ठाकरे यांच्याबरोबर होत्या. त्यानंतर अचानकपणे त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देत त्यांच्या गटात जाणे पसंत केले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनीही विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून त्यांच्यावर असलेली जबाबदारी कायम ठेवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाची माहिती देण्यासाठी गोऱ्हे यांनी प्रसारमाध्यमांना घरी बोलावले होते. त्यावेळी गोऱ्हे यांना कसबा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना विधानपरिषदेत बोलू दिले नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकताच त्या चांगल्याच संतापल्या. त्या म्हणाल्या, या पत्रकार परिषदेची बातमी न्यूयॅार्क टाइम्सला का नाही आली, असा प्रश्न विचारणे जितके मूर्खपणाचे आहे, तेवढाच हा प्रश्नही मूर्खपणाचा आहे. मला हे शब्द दुर्दैवाने वापरायला लागत आहेत.

चिडलेल्या उपसभापती डॅा.गोऱ्हे यांनी विधानसभा आणि विधानपरिषद यातील फरकच उपस्थितांना समजावून सांगितला. त्या म्हणाल्या, धंगेकर विधानसभेवर निवडून आलेत की विधानपरिषदेवर तुम्हीच सांगा. त्यांनी कुठे बोलायला पाहिजे. जिथे त्यांनी बोलायला पाहिजे तिथे ते का नाही बोलले किंवा काय बोलले याची मला माहित नाही. पण वार्तांकन करताना विधानसभा आणि विधानपरिषद यातील फरक समजावून घेतला पाहिजे. अनेकदा घाईगडबडीने चुकीच्या पद्धतीने बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे वार्तांकन करताना दोन्ही सभागृहातील फरक लक्षात ठेवा, असा मोलाचा सल्लाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिला.

(Edited By - Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT